कविता मानवी मनाच्या अंतरीचा ठाव घेते – डॉ. संजय कुलकर्णी

कविता मानवी मनाच्या अंतरीचा ठाव घेते - डॉ. संजय कुलकर्णी

उदगीर : (प्रतिनिधी ) आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटनांमधून कविता जन्म घेत असते. माणसांच्या नातेसंबंधावर, प्रेमावर, निसर्गावर कविता केली जाते. त्यामुळेच कविता मानवी मनाच्या अंतरीचा ठाव घेऊ शकते, असे मत साहित्यिक डॉ. संजय कुलकर्णी यांनी व्यक्त केले. ते संस्कार भारती शाखा उदगीरच्या वतीने आयोजित मासिक सभेत कविता सादरीकरण करताना बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्कार भारतीचे अध्यक्ष सतीश उस्तुरे हे होते.
पुढे बोलताना डॉ. कुलकर्णी म्हणाले, कविता जुन्या आठवणींना उजाळा देते. कविता जगण्यासाठी बळ देते आणि कविताच आयुष्यभर साथ-संगत करते. कविता ही एक अभिव्यक्ती असून रसिक श्रोत्यांना वाहिलेली ती शब्दफुले असतात. त्यामुळे प्रत्येकाने आपापल्या परीने लिहिते व्हावे, असे आवाहन उपस्थितांना केले. यावेळी स्वरचित काव्यसंग्रह ‘साह’, ‘असाही तसाही’ यातील अनेक कविता सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. कार्यक्रमाची सुरुवात डॉ. मुकेश कुलकर्णी यांनी सादर केलेल्या संस्कार भारतीच्या ध्येयगीताने झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. गौरव जेवळीकर यांनी तर आभार प्रा. महादेव खताळ यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रदीप पत्तेवार, संध्या पत्तेवार, नंदकिशोर पांचाळ, बालाजी मुर्के यांनी पुढाकार घेतला.

About The Author