एक वर्षा पासून बेपत्ता असलेल्या आणखीन 03 मुलींना शोधण्यात यश. “ऑपरेशन मुस्कान” अंतर्गत कारवाई.

एक वर्षा पासून बेपत्ता असलेल्या आणखीन 03 मुलींना शोधण्यात यश. "ऑपरेशन मुस्कान" अंतर्गत कारवाई.

लातूर (एल.पी.उगीले) लातूर जिल्ह्यातील ज्या मुली बेपत्ता झालेल्या होत्या, त्यांचा शोध घेण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली ऑपरेशन मुस्कान अंतर्गत धडक मोहीम हाती घेण्यात आली होती. या मोहिमेला यश आले असून गेल्या एक वर्षापासून बेपत्ता असलेल्या आणखी तीन मुलींना शोधण्यात लातूर पोलिसांना यश आले आहे.
याबाबत थोडक्यात हकीकत अशी की, सन 2023 मध्ये पोलीस ठाणे भादा, विवेकानंद व गांधीचौक पोलीस स्टेशन येथे अल्पवयीन मुलींचे अपहरण झाल्याच्या तक्रारीवरून भादवि कलम 363 प्रमाणे अनुक्रमे तीन अपहरणाचे गुन्हे दाखल करण्यात आले होते. गुन्हे दाखल झाल्यापासून संबंधित पोलीस स्टेशनचे पोलीस नमूद मुलींचा शोध घेत होते, परंतु त्या मिळून येत नव्हत्या.
पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी बऱ्याच कालावधीपासून तपासावर असलेले, आतापर्यंत मिळून न आलेल्या मुला-मुलींचा शोध घेण्यासाठी पोलीस अधीक्षक कार्यालयातील अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक पथकाला आदेशित करून सूचना व मार्गदर्शन करून “ऑपरेशन मुस्कान” राबविण्यास सांगितले होते.
त्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, अपर पोलीस अधीक्षक डॉ.अजय देवरे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील गोसावी यांचे मार्गदर्शनात अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाचे महिला पोलीस उपनिरीक्षक शामल देशमुख व पोलीस उपनिरीक्षक सुभाष सूर्यवंशी हे त्यांच्या पथकामार्फत “ऑपरेशन मुस्कान” अंतर्गत वरील गुन्ह्याचा समांतर तपास करीत होते. सदर गुन्ह्याचा तपास करीत असताना अपहरण झालेल्या मुलीचा महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यात जाऊन शोध घेतला तसेच सायबर सेलच्या मदतीने मिळालेल्या माहितीचे विश्लेषण करून मिळालेल्या माहितीवरून माळशिरस, सोलापूर, धाराशिव, तुळजापूर व राज्याच्या सीमालगत गावात सदर मुलींचा शोध घेऊन त्यांच्यासोबत असलेल्या इसमासह पोलिस ठाणे भादा , विवेकानंद व गांधी चौक येथे हजर करण्यात आले आहे. पुढील तपास संबंधित पोलीस ठाण्याचे पोलीस करीत आहेत.
“ऑपरेशन मुस्कान” अंतर्गत सदरची कारवाई पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. अजय देवरे यांचे मार्गदर्शनात अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाचे महिला पोलीस उपनिरीक्षक शामल देशमुख, पोलीस उपनिरीक्षक सुभाष सूर्यवंशी, पोहेका योगी, मापोना सुदामती वंगे, गिरी,चालक बुढे तसेच सायबर सेल यांनी विशेष परिश्रम घेतले आहे.
काय आहे “ऑपरेशन मुस्कान” ?
या मोहिमे अंतर्गत हरवलेल्या व्यक्तींचा शोध घेतला जातो. बेपत्ता व्यक्ती त्यांच्या घरच्यांना पुन्हा सूपूर्द केल्या जातात. ऑपरेशन मुस्कान म्हणजे “ज्या घरातून लोक बेपत्ता झाली आहेत. त्या घरातल्या लोकांच्या चेहऱ्यावर हसू पुन्हा आणण्यास मदत करणे.” ही मोहीम महाराष्ट्र पोलिसांनी सर्वात पहिल्यांदा 2014 मध्ये राबवली होती.लातूर पोलीस दलात 1 मार्च 2022 पासून कार्यान्वित झालेल्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष कडून आज पर्यंत 18 वर्षापेक्षा कमी वयाच्या 27 मुलींना शोधून त्यांना त्यांच्या नातेवाईकांना सूपूर्द केलं आहे.

About The Author

error: Content is protected !!