सकल मराठा समाजाचे अहमदपूर येथील साखळी उपोषण 41 व्या दिवशी स्थगित
अहमदपूर (गोविंद काळे) : येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे दिनांक 13 सप्टेंबर पासून सुरू असलेले साखळी उपोषण 41 व्या दिवशी तात्पुरते स्थगित केले असून मराठा समाजाला obc प्रवर्गातून आरक्षण मिळेपर्यंत वेगवेगळ्या मार्गाने हे आंदोलन सुरूच राहणार असल्याची माहिती सकल समाज बांधव समन्वय समितीच्या वतीने पत्रकार परिषदेत देण्यात आली. आरक्षण योध्दा श्री मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ तब्बल 41 दिवस चाललेल्या या साखळी उपोषणामध्ये तालुकाभरातील 82 गावातील 4 ते 5 हजार सकल मराठा समाज बांधवांनी सहभाग नोंदविला आहे अंतरवली सराठी नंतर सर्वात प्रभावी नियोजनबद्ध आंदोलन अहमदपूर येथे झाले असून खुद्द श्री मनोज जरांगे पाटलांनी या आंदोलनाची दखल घेऊन समनव्यय समिती मधील सर्व सदस्यांचे अभिनंदन केले आहे. अहमदपूर येथिल समन्वय समितीच्या सदस्यांनी दोन ते तीन टीम च्या माध्यमातून आतापर्यंत तालुक्यातील 85 ते 86 गावांमध्ये जाऊन समाजप्रबोधनाचे कार्य केले आहे आरक्षण कसे भेटते कसे टिकते तसेच आरक्षणाची गरज याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले आहे त्याचाच एक भाग म्हणून यापुढील कार्यकाळात आजूबाजूच्या चाकूर व जळकोट तालुक्यातील गावांमध्ये सुद्धा हे प्रबोधनाचे कार्य चालू ठेवण्याचा निर्धार समन्वय समितीच्या वतीने करण्यात आला आहे. दरम्यान या आंदोलनामध्ये सहभागी होण्यासाठी गावोगाव जणू स्पर्धा लागल्यासारखे वातावरण निर्माण झाले होते त्यातच श्री मनोज जरांगे पाटील यांच्या जाहीर सभेने अहमदपूर तालुक्यातील समाज बांधवांमध्ये नवचैतन्याचे चे वातावरण निर्माण झाले होते उपोषणामध्ये प्रत्येक गावांमधील समाज बांधवांना सहभागी होता यावे म्हणून प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या गावांचा समावेश या आंदोलनात करण्यात आला होता त्यानुसार आत्तापर्यंत 82 गावांनी या आंदोलनात सहभाग घेतला होता. हे आंदोलन पूर्णपणे अराजकीय असून गरजवंतांचा लढा म्हणून हे आंदोलन सुरू करण्यात आले आहे असे समनव्यय समितीच्या वतीने सांगण्यात आले.
25 ते 27ऑक्टोबर ला सर्कल नुसार साखळी उपोषण करण्यात येणार असून त्याबाबत चे नियोजन करण्यात येत आहे मागण्या मान्य नाही झाल्यास हे आंदोलन तीव्र स्वरूपात होणार असून 28 ऑक्टोबर नंतर गावोगावी आमरण उपोषण केले जाणार आहे, या दरम्यान कोणत्याही पक्षाच्या राजकिय पुढाऱ्यांना गावबंदी करण्यात येणार आहे त्याचबरोबर अत्यंत संविधानिक मार्गाने गरज भासल्यास अर्धनग्न आंदोलन, तिरडी आंदोलन,बोंब मारो आंदोलन,घंटा नाद आंदोलन अशी घटनात्मक आंदोलने करण्यात येणार आहेत अशी माहिती समनव्यय समितीच्या वतीने पत्रकार परिषदेत देण्यात आली. यावेळी उपस्थित पत्रकार बांधवांच्या हस्ते नारळ पाणी पिऊन तब्बल 41 दिवस चाललेले साखळी उपोषण तात्पुरते स्थगित करण्यात आले असून पुढील आंदोलने श्री मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली चालूच राहणार आहेत.