तुकोबांशी साधलेला आत्मीय संवाद म्हणजे ‘डियर तुकोबा’ – डॉ हणमंत पवार
उदगीर (एल.पी.उगीले) : भारत ही साधू संतांची भूमी असून ज्यांनी भक्ती मार्गाचा कळस रचला अश्या जगद्गुरू तुकाराम महाराजांशी आजच्या नवतंत्रज्ञान युगाच्या काळात काल्पनिकपणे साधलेला आत्मीय संवाद म्हणजे ‘डियर तुकोबा’ ही साहित्यकृती होय. असे मत डॉ हणमंत पवार यांनी व्यक्त केले. उदगीरचे वैभव असलेल्या चला कवितेच्या बनात या चळवळीच्या वतीने चालवल्या जात असलेल्या 299 व्या वाचक संवाद मध्ये विनायक होगाडे लिखित डियर तुकोबा या साहित्यकृतीवर डॉ हणमंत पवार,शहीद भगतसिंग महाविद्यालय किल्लारी, यांनी संवाद साधला. यावेळी बोलताना ते म्हणाले की ‘डियर तुकोबा’ या कादंबरी मध्ये तीन भाग आहेत. यापैकी पहिल्या ‘तुकारामायण’ या भागात लेखकांनी तुकोबांना महात्मा गांधी, संत गाडगेबाबा, साने गुरुजी, संत कबीर, सॉक्रेटिस, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, राजर्षी शाहू, गॅलिलिओ, कर्मवीर भाऊराव पाटील या सर्व महापुरुषांना विचाराच्या एका धाग्यात गुंफलेले आहे. प्रत्यक्ष या महामानवाच्या भेटीची अनुभूती घेत घेत आपणही त्या भेटीचा एक भाग बनून जातो. विशेषत: ‘तुकोबा – सॉक्रेटिस भेट’, तुकोबा गॅलिलिओ भेट घडवून आणून लेखक तुकोबांना विश्व पटलावर घेऊन जातो. प्रत्येक महापुरुषाशी तुकोबांची भेट अफलातून आहे. या महापुरुषांच्या विचारात विद्रोहाची जी किनार दिसून येते, तोच धागा लेखकाने उत्तमरीत्या पकडला आहे.
पुस्तकाचा दुसरा भाग “मीडिया ट्रायल ऑन तुकोबा” मध्ये लेखकाची कल्पना अशी आहे की, तुकोबांच्या जीवनातील महत्त्वपूर्ण प्रसंग ज्यामध्ये धर्मपीठाचा आदेश, तुकोबांनी स्वतःच्या हाताने आपली गाथा इंद्रायणीत बुडवणे, अन्न पाणी त्याग, सामान्य लोकांचं त्यांच्याकडे आकर्षित होणं आणि लोकांनीच कशाप्रकारे गाथा तारली याचं लाईव्ह चित्रण लेखकानी केलं आहे. विशेषतः आजच्या दृष्टिकोनातून सोशल मीडियावर या सर्व प्रसंगाची कशा प्रतिक्रिया उमटल्या असत्या, याचं प्रत्यक्ष चित्रण अत्यंत प्रभावीपणे लेखकानी केलेलं आहे. जणू हा सोहळा आपण प्रत्यक्ष अनुभवत आहोत असं वाटायला लागतं. तसेच बहिणाबाई, जेऊरकर, शेख मोहम्मद, कान्होबा, संतू जगनाडे, जितू, मुका नरहरी, वेडसर गुळ्या यांची तुकोबांना मिळालेली साथ उत्कृष्ट पद्धतीने मांडली आहे. कादंबरीच्या तिसऱ्या महत्वपूर्ण भागात लेखकाने दीर्घ पत्र लिहून तुकोबांशी जणू आत्मीय संवाद साधला आहे. त्यातून आजच्या नव्या पिढीला अत्यंत साध्या, सोप्या भाषेत तुकोबा दर्शन करून दिलं आहे.यावेळी झालेल्या चर्चेत अनेकांनी सहभाग घेतला. यानंतर उपस्थितांना जन्मदिनानिमित्त ग्रंथ भेट देण्यात आली. अध्यक्षीय समारोपात डॉ संग्राम मोरे म्हणाले की, संवादकाने तुकोबा भेटीचा वाचकांना परमोच्च आनंद दिला आहे. असे कौतुक करत वाचनाच्या या महायज्ञात सहभागी होऊन वाचक चळवळीला बळ देत स्वतःच्या ज्ञानात भर घालून घ्यावी, असे आवाहनही केले. या कार्यक्रमाचे संचालन डॉ बालाजी सूर्यवंशी यांनी केले. संवादकांचा परिचय प्रसिद्ध वक्ते डॉ ज्ञानदेव राऊत यांनी करून दिला तर आभार डॉ विष्णु पवार यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीततेसाठी संयोजक अनंत कदम, आनंद बिरादार, प्रा.राजपाल पाटील, हणमंत म्हेत्रे व मिटू पाटील आदींनी परिश्रम घेतले.