उच्च शिक्षणातून विद्यार्थ्यांमध्ये प्रयोगशीलता संशोधनात्मकवृती निर्माण झाली पाहिजे- प्राचार्य डॉ. वसंत बिरादार
अहमदपूर (गोविंद काळे) : विद्यार्थ्यांनी संपादन केलेल्या पदवीच्या जबाबदारीचे भान ठेवावे विद्यार्थ्यांमध्ये उच्च शिक्षणातून प्रयोगशीलता व संशोधनात्मक वृत्ती निर्माण झाली पाहिजे, असे प्रतिपादन सुप्रसिद्ध लेखक, समीक्षक प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांनी केले.
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड आणि महात्मा फुले महाविद्यालय अहमदपूर आणि यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ अभ्यास केंद्र महात्मा फुले महाविद्यालय अहमदपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पदवी वितरण समारंभात ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी किसान शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्रीरंगराव पाटील एकंबेकर हे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून किनगाव येथील महात्मा फुले महाविद्यालयाचे माजी प्राचार्य तथा लोकसाहित्याचे गाढे अभ्यासक, प्रगतीशील शेतकरी डॉ. धोंडीराम वाडकर यांच्यासह महाविद्यालयाचे उपप्राचार्य तथा आयक्यूएसी समन्वयक डॉ. डी.डी.चौधरी, महाविद्यालय विकास समितीचे सदस्य प्रो .डॉ. अनिल मुंढे, डॉ. बब्रुवान मोरे, प्रशांत डोंगळीकर, ‘ नॅक ‘ समन्वयक डॉ. प्रशांत बिरादार, परीक्षा विभाग प्रमुख प्रो.डॉ. अभिजीत मोरे हे उपस्थित होते. यावेळी पुढे बोलताना प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील म्हणाले की, यशासाठी विद्यार्थ्यांनी कठोर परिश्रम हाच एकमेव पर्याय आहे. सातत्याने वाचन, चिंतन, निरीक्षण आणि संशोधन केले पाहिजे. शिक्षणाचा देशासाठी संशोधनात्मक दृष्ट्या उपयोग झाला पाहिजे असेही ते यावेळी म्हणाले.
यावेळी बोलताना माजी प्राचार्य डॉ. धोंडीराम वाडकर म्हणाले की माणूस आयुष्यभर विद्यार्थी असला पाहिजे. जो रोज नवनवीन काहीतरी शिकतो, तोच खरा माणूस. माणसाने आपल्या शिक्षणाचा सुंदर जीवन जगण्यासाठी त्याच बरोबर समाजाच्या भल्यासाठी उपयोग करावा असेही ते म्हणाले.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष किसान शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्रीरंगराव पाटील एकंबेकर यांच्या हस्ते उपस्थित विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. पांडुरंग चिलगर यांनी केले. महाविद्यालयातील व यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक अभ्यास केंद्र महात्मा फुले महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक, विद्यार्थी,पालक तसेच नूतन पदवीधारक विद्यार्थी उपस्थित होते.