जीवनातील छोट्या छोट्या गोष्टीत आनंद शोधता आला पाहिजे -डॉ.अनिल भिकाणे
उदगीर (एल.पी.उगीले) पर धर्म सहिष्णुता हा भारतीय संस्कृतीचा अलंकार आहे. रमजान हा मुस्लिमांचा पवित्र महिना यानिमित्ताने त्यांच्या रोजा साठी हिंदू बांधवांनी दिलेली फळांची भेट ही बाब दिसायला छोटी असली तरी अशा जीवनातील छोटे-छोटे क्षणच फार मोठा आनंद देऊन जातात असे प्रतिपादन महाराष्ट्र पशु विज्ञान व मत्स्य विद्यापीठ नागपूरचे संचालक डॉ.अनिल भिकाणे यांनी केले. ते महाराष्ट्र अंनिस शाखा उदगीर, व जिव्हाळा ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने देगलूर रोड येथे आयोजित कार्यक्रमात बोलत होते.
रमजानच्या पार्श्वभूमीवर रोजा सोडण्यासाठी यावेळी सेवानिवृत उपसंचालक डॉ. अजहर शेख यांना डॉ.अनिल भिकाणे यांच्या हस्ते स्ट्रॉबेरी बॉक्स देण्यात आला. तर डॉ.अजहर शेख यांनी राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक विश्वनाथ मुडपे गुरुजी यांना पुस्तके भेट दिली.यावेळी डॉ.अजहर शेख यांनी रमजान किंवा रमदान हा मुस्लिमांचा सर्वात पवित्र महिना म्हणून मुस्लिम बांधव रोजा (उपवास) करतात. रोजा ही एक आदम म्हणजे ईश्वराप्रती कृतज्ञता भाव आहे.असे सांगितले. यावेळी जिव्हाळा ग्रुपचे अध्यक्ष देविदास नादरगे, प्रा.डॉ.दत्ताहरी होनराव,अंनिस शाखा उदगीरचे संयोजक विश्वनाथ मुडपे, नवनाथ पाटील, दशरथ शिंदे, पांडुरंग बोडके, सोपानराव माने, अशोकराव बिरादार, दयानंद शिवशेट्टे,अमृतराव देशपांडे, वैजनाथ पंचगल्ले , लक्ष्मीकांत बिडवे, शंकरराव साबणे, हरिश्चंद्र वट्टमवार इत्यादी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आभार विश्वनाथ मुडपे यांनी मानले.