307 शाळांमध्ये पालक मेळाव्याद्वारे मतदार जागृती !
लातूर (एल.पी.उगीले) : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक -2024 मध्ये मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी श्रीमती वर्षा ठाकूर-घुगे यांच्या आदेशानुसार स्वीप कार्यक्रमांतर्गत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून 235- लातूर शहर मतदारसंघामध्ये सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी रोहिणी नेऱ्हे-विरोळे यांच्या मार्गदर्शनाखाली 307 शाळांमध्ये 26 मार्च 2024 रोजी पालक मेळावे आयोजित करण्यात आले होते.
मतदार जागृतीसाठी पालक मेळावे या नाविण्यपूर्ण उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमार्फत पालकांमध्ये मतदानाविषयी जागृती करण्यात आली. यावेळी पालकांना मतदान करण्याबाबतचे संकल्पपत्र देवून मतदानाचे महत्व सांगण्यात आले. तसेच उपस्थित पालकांना जिल्हा निवडणूक कार्यालयामार्फत देण्यात आलेल्या पॉवर पॉईट प्रझेंटेशनद्वारे मतदानाचे महत्व पटवून देण्यात आले. तसेच 7 मे, 2024 रोजी न चुकता मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले.
शिक्षण क्षेत्रातील लातूर पॅटर्नप्रमाणे सर्वांनी हिरीरीने मतदान करुन लातूर लोकसभा मतदारसंघातील मतदान टक्केवारी वाढवून यामध्येही नवा लातूर पॅटर्न तयार करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला. सर्व विद्यार्थ्यामार्फत आई-वडिलांना पत्र देवून प्रत्येक पालकांकडून मतदान करण्याबाबतचे संकल्पपत्र भरून घेण्यात आले. तसेच सर्व पालकांना मतदान करण्याबाबतची शपथ देण्यात आली.