नव्या पिढीच्या उज्वल भवितव्यासाठी महाविकास आघाडीला मत द्या – निवृत्ती सांगवे

0
नव्या पिढीच्या उज्वल भवितव्यासाठी महाविकास आघाडीला मत द्या - निवृत्ती सांगवे

उदगीर (एल. पी. उगिले) सद्यस्थितीत देशातील प्रचंड बेकारी आणि बेरोजगारी तसेच शेतकऱ्यांच्या संदर्भात प्रचंड अनास्था हे सर्व चित्र बदलून नव्या पिढीला आदर्श भारत निर्माण करण्याची क्षमता असलेल्या महाविकास आघाडीला विजयी करा असे आवाहन राष्ट्रीय दलित अधिकार मंचचे प्रदेशाध्यक्ष तथा दलित पॅंथरचे प्रदेश उपाध्यक्ष निवृत्ती सांगवे यांनी केले आहे. भारतीय जनता पक्षाचे केंद्रातील आणि राज्यातील सरकार सर्वच आघाड्यावर अपयशी ठरले आहे. शिक्षण व्यवस्था मोडीत काढून खाजगीकरणाचा मोठा घाट या सरकारने मांडला आहे. त्यामुळे गोरगरिबांच्या मुलांना शिक्षणासाठी शाळा शिल्लक राहणार नाहीत. खाजगी शाळेतील भरमसाठ शुल्क गोरगरिबांच्या मुले भरू शकणार नाहीत. या सर्व गोष्टींचा सामाजिक जाणीव म्हणून विचार करून आपले मत सत्कारणी लावावे असे आवाहन त्यांनी केले आहे.
पुढे बोलताना ते म्हणाले की,लातूर लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. शिवाजीराव काळगे हे सर्वसामान्यांचे प्रतिनिधित्व करणारे उमेदवार आहेत. सतत सामाजिक सेवेमध्ये राहिल्यामुळे त्यांच्याबद्दल जनमानसामध्ये आदराची प्रतिमा आहे.
भारतीय जनता पक्षाने गेल्या दहा वर्षात “अच्छे दिन आयेंगे” असे स्वप्न दाखवले होते. तसेच प्रत्येकाच्या खात्यावर 15 लाख रुपये जमा करण्याची फसवी घोषणा केली होती. सुशिक्षित बेकार, बेरोजगारांसाठी वर्षाकाठी दोन करोड तरुणांना नोकऱ्या देण्याच्या आश्वासन दिले होते.
सर्वसामान्य नागरिकांना भूलथापा देणे आणि फसव्या घोषणा करणे, हे आता भारतीय जनता पक्षाला महाग पडणार आहे. कारण लोक आता ओळखू लागले आहेत. एका बाजूला फसव्या घोषणा तर दुसऱ्या बाजूला समाजसेवी वृत्तीने काम करणारा जमिनीवर पाय असलेला उमेदवार काँग्रेस पक्षाने दिलेला असल्यामुळे सर्वसामान्य जनता डॉ. शिवाजीराव काळगे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. कधी नव्हे इतक्या विक्रमी मताधिक्याने काँग्रेस पक्ष विजयी होईल. अशी ग्वाही राष्ट्रीय दलित अधिकार मंचचे प्रदेशाध्यक्ष निवृत्तीराव सांगवे यांनी दिली आहे.

भारतीय जनता पक्षाने सतत लोकांना वेड्यात काढून कधी धनगर आरक्षणाचा मुद्दा उपस्थित केला, तर कधी मराठा समाजाला आरक्षण देण्याचा प्रश्न प्रलंबित ठेवला. या सर्व प्रकारामुळे समाजातील सर्वच घटक भारतीय जनता पक्षावर चिडलेले आहेत. मराठा समाजातील हजारो विद्यार्थी शिक्षण घेऊन नोकरी मिळत नसल्यामुळे निराश झाले आहेत. अनेक तरुण आत्महत्या करत आहेत. या सरकारला कोणतेही प्रश्न निकाली काढायचे नाहीत, उलट ते प्रश्न झुलवत ठेवून समाजाच्या कोपराला गुळ लावण्याचे प्रवृत्ती या सरकारचे असल्यामुळे जनता चिडलेली आहे. शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य भाव मिळत नाही. कांदा निर्यातीवर बंदी आहे, मात्र गुजरातच्या शेतकऱ्यांसाठी कांदा निर्यात वरील बंदी उठवली आहे. मग आता हे पंतप्रधान आपल्या देशाचे आहेत की एकट्या गुजरातचे आहेत? असाही प्रश्न राष्ट्रीय दलित अधिकार मंचचे नेते निवृत्ती सांगवे यांनी उपस्थित केला आहे.
सद्यस्थितीत शेतमालाला भाव मिळत नाही. अशा परिस्थितीत सोयाबीन तेल आयात करून शेतकऱ्यांची मोठी थट्टा भाजपा सरकारने उडवली आहे.
भाजप सरकारने सोयाबीन पेंड, डी ओ सी, सोयातेल आयात केले आहे. एवढेच नाही तर केंद्र सरकारने खाद्य तेलावर एक लाख कोटी 23 हजार रुपयांचे खाद्यतेल आणि कडधान्य आयातीवर 31 हजार कोटी रुपये खर्च केलेले आहेत. दुष्काळ आणि शेतमालाचे पडलेले भाव भाव पाहून शेतकरी अडचणीत सापडला आहे. प्रचंड महागाईने होरफळलेल्या आणि आर्थिक विवंचनेत अडकलेल्या आपल्या देशातील शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून सरकारने दुसऱ्या देशातील शेतकऱ्यांची चांदी केली आहे. ही बाब कोणत्याही भारतीयांना चीड आणणारी आहे. एका बाजूला भोंगळ आदर्शवाद सांगून राष्ट्रवाद निर्माण करायचा, आणि प्रत्यक्षात आपल्या राष्ट्रातील शेतकऱ्याचे खच्चीकरण करायचे. ही दुतोंडी प्रवृत्तीच आता भारतीय जनता पक्षाला संपवायला कारणीभूत ठरणार आहे.
गेल्या दहा वर्षापासून भारतीय जनता पक्षाचा खासदार लातूर जिल्ह्याने दिला आहे. मात्र एकाही प्रश्नाकडे भारतीय जनता पक्षाच्या कोणत्याही उमेदवाराने पाहिले नाही. सर्वसामान्यांच्या अडीअडचणी सोडवल्या नाहीत. आपल्या विभागातील व्यापाऱ्यांच्या, शेतकऱ्यांच्या, कामगारांच्या, कष्टकऱ्यांच्या जीवनाशी निगडित असलेल्या कोणत्याही प्रश्नाकडे कधीही भारतीय जनता पक्ष सरकारने सहानुभूतीने विचार केला नाही. त्यामुळे खोटे बोल पण रेटून बोल, ही प्रवृत्ती असणाऱ्या भाजपाला आता जनता निश्चित ताळ्यावर आणणार आहे.
महागाईने सर्वसामान्य माणसांचे जगणे मुश्किल केले आहे.पेट्रोल, डिझेल यांच्या वाढलेल्या भावामुळे, गॅसचा भाव वाढीमुळे जनता हैराण झालेली आहे. खताचे भाव, शेतीसाठी लागणारे औषधाचे भाव मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत. शासकीय कंपन्या खाजगीकरणाच्या गोंडस नावाखाली विकून टाकून त्यांचे खाजगीकरण केल्यामुळे तरुणांच्या हाताला काम नाही, नोकऱ्या नाहीत. भुलभुलय्या करणे आणि मोठमोठा थापा मारणे, दिशाभूल करणे ही प्रवृत्ती आता उघड पडली आहे. त्यामुळेच लातूर जिल्ह्यातील जनता आता शिवाजीराव काळगे यांना विक्रमी मताधिक्याने विजयी करेल. असा विश्वास निवृत्तीराव सांगवे यांनी व्यक्त केला आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *