चार कि.मी. अंतरावरून वळण रस्ता मतदानावर बहिष्कार ; सुनेगाव (सांगवी) सुने-सुने
अहमदपूर (गोविंद काळे) : तालुक्यातील लातुर- नांदेड हायवेवर असलेल्या सुनेगाव ( सांगवी ) गावाला चार कि.मी अंतरावरून वळण रस्ता असल्यामुळे ग्रामस्थांचे प्रचंड हाल होतात. येथील ग्रामस्थांना नॅशनल हायवे वरून ०.५ किलोमीटरच्या रस्त्यासाठी तब्बल चार किलोमीटर अधिकचा प्रवास करावा लागतो. प्रशासनाकडे रस्ता कामासाठी पाठपुरावा करून काम होत नसल्याने ग्रामस्थांनी लोकसभेसाठी मंगळवारी ७ मे रोजी झालेल्या मतदानावर बहिष्कार टाकला. ४७७ मतदार असलेल्या या गावात एकही मतदार मतदान बुथकडे फिरकले नाही. प्रशासनाकडून दिवसभर ग्रामस्थांची समजूत काढण्याचा प्रयत्न झाला. मात्र प्रतिसाद मिळाला नाही.
सुनेगाव ( सांगवी ) गावची ८०० ते ९०० लोकसंख्या जवळपास आहे. या गावाला अहमदपूरहून येण्यासाठी लातुर- नांदेड नॅशनल हायवे क्र ३६१ वरून रस्ता असुन गावात जाण्यासाठी ०.५ किलोमिटरचे अंतर आहे परंतु ग्रामस्थांना गावात येण्यासाठी तब्बल चार किलोमिटर फिरका घालुन यावे लागते लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यावर येथील ग्रामस्थांनी नॅशनल हायवे क्र ३६१ वर कट पॉईंट करून बस थांबा केल्याशिवाय मतदान करणार नाही, असा पवित्रा दि २३ एप्रिल रोजी तहसील कार्यालय येथे निवेदन देऊन घेतला. तसेच याबाबत ग्रामस्थांनी बैठक घेऊन दि ६ मे रोजी रात्री ८ : ३० वाजता मतदानावर बहिष्कार टाकत असल्याचे निवेदनही दिले. अधिकाऱ्यांकडून ग्रामस्थांची समजूत काढण्याचा प्रयत्नही झाला.मात्र ग्रामस्थ आपल्या मागणीवर ठाम होते. गेल्या वर्षांपासून आम्ही पाठपुरावा करतो. तरीही काम होत नाही. यामुळेच बहिष्काराचा निर्णय घेतल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.
दरम्यान, अहमदपूरचे तहसीलदार शिवाजी पालेपाड यांनी मंगळवारी सकाळी ७ वाजता गावाला भेट दिली. ग्रामस्थांना एकत्र करून त्यांनी समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र एकानेही त्यांचे ऐकून घेतले नाही. याबाबतची माहिती मिळताच उपजिल्हाधिकारी मंजुषा लटपटे, उपविभागीय पोलीस अधिकारी मनिष कल्याणकर, पोलीस स्टेशन अहमदपूर पोलीस निरिक्षक प्रशिक्षणार्थी पोलीस उप-अधिक्षक नवदिप अगरवाल गटविकास अधिकारी अमोलकुमार अंदेलवाड नायब तहसीलदार मधुकर क्षिरसागर हे दुपारी गावात पोहोचले. यावेळी सर्व अधिकाऱ्यांनी ग्रामस्थांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. शिवाय निवडणुकीनंतर कामही मार्गी लागेल, याबाबतची शाश्वती देत बहिष्कार मागे घ्यावा अशी विनंतीही केली. परंतु ग्रामस्थांनी ठाम भूमिका घेत बहिष्कार कायम ठेवला. यामुळे सायंकाळी ६ : ०० वाजेपर्यंत निवडणूक आयोगाच्या मतदान बुथवर एकही मतदार आला नाही. परंतु कर्तव्यावर असलेल्या दोन कर्मचाऱ्यांनी मतदान केले
वर्षापासून रस्त्याची मागणी कायम…
सुनेगाव ( सांगवी ) गावास ये-जा करण्यासाठी नॅशनल हायवे क्रमांक ३६१ वर कट पॉईंट व बस थांबा नाही. त्यामुळे गेल्या वर्षापासून आम्ही कट पॉईंट व बस थांब्याची मागणी करीत आहोत. प्रशासन त्याची दखल घेत नाही, असे मधुकर सुरनर माजी पोलीस पाटील यांनी सांगितले. त्यामुळे निवडणुकीवर बहिष्कार टाकला आहे.
कोट
दिनांक 23 एप्रिल रोजी सुनेगाव सांगवी ग्रामस्थांनी यासंदर्भात निवेदन दिले होते . त्याच्या अनुसंगाने मी हायवे अथॉरिटी ना पत्र लिहून ग्रामस्थांच्या मागणीबाबत कळवले होते व बोलणेही झाले आहे.
त्यावेळी आम्ही ग्रामस्थांशी गावात जाऊन चर्चाही केली आहे .बहिष्कार हा पर्याय नसल्याचे आम्ही ग्रामस्थांना समजावून सांगितले . परत दिनांक 6 मे रोजी मी आणि तहसीलदार शिवाजी पालेपाड यांनी ग्रामस्थांशी चर्चा केली .परत6 मे रोजी रात्री 8:30 वाजता ग्रामस्थांनी बहिष्काराचे निवेदन दाखल केले. सदर प्रकरणी ग्रामस्थांनी आम्ही सुचवलेले कोणताच पर्याय मान्य नसल्याचे सांगून बहिष्कार कायम ठेवला आहे.
मंजुषा लटपटे
उपजिल्हाधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी अहमदपूर.