अहमदपूरातील बँकेच्या समोर लाडक्या बहिणींमुळे यात्रेचे स्वरूप
अहमदपूर ( गोविंद काळे ) शासनाने जाहिर केलेल्या ‘मुख्यमंत्री लाडकी बहिण’ योजनेची रक्कम रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर वितरणास सुरुवात केली. राज्यभरातील भगिनिंच्या बँक खात्यात एकाच वेळी रक्कम जमा झाल्याने पैसे काढण्याची धांदल उडाली आहे. परिणामी, सर्वच बँकांमध्ये लाडक्या बहिणींच्या लांबच लांब रांगा लागल्याचे दिसून येत आहे. परिणामी, एसबीआय सह सर्वच बँकेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण वाढला आहे.
लाडकी बहीण योजनेची रक्कम मिळण्यास सुरूवात झाली. त्यामुळे बँकेच्या शाखेत अचानक गर्दी उसळली. पैसे काढण्यासाठी आलेल्या महिलांशिवाय ज्या महिलांना रक्कम मिळाली नाही. त्या महिला विचारणा करण्यासाठी बँकात पोहचू लागल्या आहेत. त्यामुळे योजनेची रक्कम वितरीत करावी की, महिलांना आधार लिंकींग व इतर तांत्रिक अडचणींची माहिती द्यावी. अशी अवस्था बँक अधिकारी, कर्मचाऱ्यांची झाली आहे. बहुतांश महिलांचे बँक खाते आधार लिंक नाही तर काहींची केवायसी प्रलंबित आहे. त्यामुळे योजनेची रक्कम खात्यात जमा झाल्याचा संदेश आलेल्या महिलांपेक्षा ज्या महिलांना रक्कम मिळाली नाही. अशा महिलां अधिकाऱ्यांना, कर्मचाऱ्यांना जाब विचारत असल्याने बँकांमध्ये वादाचे प्रसंग घडत असल्याचे चित्र दिसून येत असल्यामुळे सेक्यूरी गार्ड ची दमछाक होत असल्याचे दिसते.