विधानसभा निवडणूक अनुषंगाने गुन्हेगारी प्रवृत्तीच्या 1,831 लोकांवर प्रतिबंधात्मक कारवाई.
लातूर (एल.पी.उगीले) महाराष्ट्र राज्य विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांचे आदेशान्वये, अपर पोलीस अधीक्षक डॉ.अजय देवरे यांचे मार्गदर्शनात लातूर पोलिसांनी गुन्हेगारी प्रवृत्तीच्या ज्यांच्या वर्तनातून शांतता भंग होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असलेल्या व्यक्ती विरोधात विविध कायदा कलमान्वये प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली असून, आतापर्यंत 1 हजार 831 व्यक्तीविरुद्ध प्रतिबंधात्मक कार्यवाही करण्यात आली आहे .
यामध्ये भारतीय न्याय संहिता कलम 126 प्रमाणे 1430, कलम 128 प्रमाणे 2, कलम 129 प्रमाणे 134 व्यक्ती विरोधात प्रतिबंधात्मक कार्यवाही करण्यात आली आहे, तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951, कलम 55 प्रमाणे गुन्हेगारी प्रवृत्तीच्या 02 टोळीला हद्दपार करण्यात आले आहे. कलम 56 प्रमाणे 20 तर, कलम 57 प्रमाणे 10 कारवाया करण्यात आलेल्या आहेत.
देशी-विदेशी दारू, हातभट्टीची अवैध विक्री, निर्मिती, साठवणूक करणाऱ्या तसेच त्यांच्यावर वारंवार गुन्हे दाखल करूनही वर्तनात काहीच फरक पडत नसलेल्या व परत-परत महाराष्ट्र दारूबंदी कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या 233 व्यक्तीवर महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम1949 कलम 93 अन्वये कार्यवाही करण्यात आली आहे.
एकंदरीत आगामी विधानसभा निवडणूक शांततेत पार पडावी, मतदारांना भयमुक्त वातावरणात मतदान करता यावे आणि कोणताही अनुचित प्रकार घडू नये, याकरिता पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी आवश्यक उपाययोजना हाती घेतल्या आहेत. त्यानुसार संपूर्ण लातूर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे.
विविध गुन्ह्यांतर्गत पोलिसांच्या रेकॉर्डवर असलेल्या गुन्हेगारांना नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. त्यांच्यावर विविध कायद्यांतील कलामांतर्गत कारवाया केल्या जात आहेत. गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल असलेल्या गुन्हेगारांना तडीपार करण्यात येत आहे.