शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी महाराष्ट्रातील आघाडीच्या खासदारांचे कृषिमंत्र्याला साकडे – खा.डॉ. काळगे

उदगीर(एल. पी. उगिले)
शेतकऱ्यांची परिस्थिती दिवसेंदिवस बिघडत चालली आहे. आणि निवडणुकीच्या दरम्यान महायुतीकडून दिलेली आश्वासने पाळली जात नसल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. शेतकऱ्यांच्या समोर अनेक समस्या आहेत. त्या समस्या सोडवण्यासाठी केंद्र शासनाने विशेष प्रयत्न करावेत. अशी आग्रही मागणी करण्यासाठी महाराष्ट्रातील महाविकास आघाडीच्या खासदारांनी कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांची भेट घेऊन तोडगा काढण्याची विनंती केली असल्याची माहिती लातूर चे खासदार डॉ. शिवाजीराव काळगे यांनी दिली आहे.
कृषिमंत्र्याला निवेदन देण्याच्या प्रसंगी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या विविध समस्यांच्या संदर्भात चर्चाही करण्यात आली. यावेळी खासदार कल्याण काळे, खा. ओमराजे निंबाळकर, खा. प्रणिती शिंदे, खा. बळवंत वानखेडे, खा. शोभा बच्छाव, खा. गोवाल पाडवी,खा. नामदेव किरसान इत्यादी मान्यवर लोकप्रतिनिधींनी कृषी मंत्र्यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले आहे.
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा केला जावा. शेतकऱ्यांना कर्जमाफीची सवलत देण्याची भाषा पूर्वी करण्यात आली होती, मात्र आता सविस्तरपणे त्या गोष्टीचा विसर पडतो आहे. ही शेतकऱ्यांची थट्टा असून शेतीमालाला देखील योग्य भाव मिळत नाही, ही खंत आहे. हमीभावाच्या बाबतीत देखील शेतकऱ्यांची थट्टा केली जाते आहे. असे महाराष्ट्रातील महाविकास आघाडीच्या खासदारांनी कृषिमंत्र्याकडे म्हणणे मांडले आहे.