सौ. मनोरंजना परगे (लंजिले) आरोग्य सहाय्यिका यांची सेवापूर्ती गौरव व कृतज्ञता सोहळा

उदगीर (एल.पी. उगीले) तालुक्यातील कर्तव्यदक्ष आरोग्य सहाय्यक श्रीमती मनोरंजना व्यंकटराव परगे (लंजिले) या लातूरच्या आरोग्य विभागात दिनांक 16 डिसेंबर 1985 ते 31 मार्च 2025 पर्यंत तब्बल 40 वर्षाच्या प्रदीर्घ शासकीय सेवेतून सेवानिवृत्त झाल्या आहेत. त्यांच्या या यशस्वी सेवेनिमित्त, ऋणनिर्देशा करीता सेवापूर्ती व कृतज्ञता सोहळा आयोजित करण्यात आला होता. सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी माजी जि.प. अध्यक्ष राहुलभैया केंद्रे तर प्रमुख पाहुणे म्हणून जि.प. माजी उपाध्यक्ष रामभाऊ तिरूके, जि प सदस्य शिवाजी परगे, रमेश गोमारे, न.प. गटनेते बापूराव येलमटे, अशोक परगे, माजी उपसभापती हनुमंत हंडरगुळे, वैद्यकीय अधिकारी डॉ.शरद गिरी, गजानन शिंदे ,प्राचार्य यशवंत माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय अहमदपूर, प्रा. बस्वराज धोत्रे , मुख्याध्यापक राम बोंबडे, निळकंठ पाटील आदींच्या उपस्थितीत कृतज्ञता सोहळा संपन्न झाला.
दीप प्रज्वलाने कार्यक्रमाची सुरुवात झाली त्यानंतर वर्षा राणी मुस्कावड यांनी स्वागत गीत सादर केले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक मोठा मुलगा अजित लंजिले सहशिक्षक यशवंत विद्यालय यांनी केले. मान्यवरांच्या शुभहस्ते मनोरंजना परगे( लंजिले) त्यांचे पती बालाजी लंजिले यांचा विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती, भर आहेर ,शाल बुके देऊन सत्कार, सन्मान करण्यात आला. यावेळी सो मनोरंजना परगे यांची नात पवित्रा, डॉ .गिरी , सर्जेराव भांगे,रामभाऊ तिरुके यांनी मनोगत व्यक्त केले.
रामभाऊं तिरके यांनी ” माझ्या या सिस्टरने आरोग्य सेवेतही रुग्णांची सिस्टर होऊन सेवा केली. म्हणूनच त्याचे फळ म्हणजे त्यांचा सुखी संसार होय” असे गौरव उद्गार काढले.
अध्यक्षीय समारोपात राहुल केंद्रे म्हणाले” परगे( लंजिले) ताई म्हणजे आरोग्य सेवा केंद्र ते संस्कार केंद्र असे बहुआयामी व्यक्तिमत्व होय. त्यांना आनंदीबाई जोशी पुरस्कार आरोग्य क्षेत्रात उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल मिळाला. त्यांचा हा आदर्श इतर मुलींनी घ्यावा. पालकांनीही आपल्या मुलीला पुढे शिकण्यास ,नोकरी करण्यास प्रवर्त करावे, अशी भावना व्यक्त केली”. सत्कारास उत्तर देताना श्रीमती मनोरंजना परगे (लंजीले) म्हणाल्या की, मी केलेल्या निस्वार्थ सेवेमुळेच की काय, माझ्या परिवारावर प्रेम करणारे सर्व आप्तेष्ट येथे आले. व मला भरभरून शुभेच्छा व आशीर्वाद दिला. मी खरंच भारावून गेले. असा सोहळा जीवनात मी अनुभवला व पाहिला नव्हता.
या सेवापूर्ती सोहळ्याकरिता निमंत्रित पाहुणे मंडळी ,नातेवाईक, मित्रपरिवार, व्यापारी, सामाजिक क्षेत्रातील मान्यवर आदींची उपस्थिती होती.
या सोहळ्याचे सूत्रसंचालन डॉ.शरद अशोकराव करकनाळे व वर्षाराणी मुस्कावाड यांनी केलं तर आभार विजय लंजिले यांनी मानले .