म्हशी चोरट्याची अजब तऱ्हा !!पोलिसापासून लपण्यासाठी गटाराचा सहारा !!

रोख ठोक::- ऍड. एल.पी.उगीले
पोलीस मागे लागले की, चोरटे पोलिसापासून स्वतःचा बचाव करून घेण्यासाठी लपाछपीचा खेळ खेळतात. मात्र एका म्हशी चोरट्याने चक्क गटारात बसून लपून राहण्याचा विक्रम केला. अत्यंत दुर्गंधीयुक्त गटारामध्ये चेहरा वर ठेवून पूर्ण घाणी मध्ये बसून राहिला. मात्र उदगीर ग्रामीण पोलीस स्टेशनच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने तशाही अवस्थेत त्याला पकडून, वॉशिंग मशीनच्या साह्याने स्वच्छ धुऊन काढले. बचावासाठी आपल्या अंगावरील घाण पोलिसाच्या अंगावर टाकण्याचाही त्या चोरट्याने प्रयत्न केला. मात्र तरीही पोलीस घाबरले नाहीत, मोठ्या हिमतीने त्या चोरट्याला दुचाकी, चार चाकी गाड्या धुण्याच्या वॉशिंग सेंटरवर नेऊन त्याला स्वच्छ धुतले. आणि त्याच्यावरील रीतसर कारवाही केली.
या प्रकरणाची पोलीस सूत्राकडून हाती आलेली माहिती अशी की, उदगीर शहर हे कर्नाटक, तेलंगणा आणि महाराष्ट्राच्या सीमेवर असल्यामुळे महाराष्ट्रातून म्हशी, गाई अशी जनावरे चोरून ती कर्नाटकात किंवा तेलंगणात स्वस्तात बिनधास्तपणे विक्री करून चोरटे निवांत राहायचे. पोलिसांनी कितीही शोध घेतला तरी ते सापडायचे नाहीत.
दिनांक 17 आणि 18 नोव्हेंबर 2024 च्या रात्री उदगीर तालुक्यातील माळेवाडी शिवारातून सविता धोंडीबा कडोळे यांची म्हैस चोरट्याने पळवल्याची घटना घडली. याबाबत उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल झाला. यातील आरोपीचा शोध सुरू असताना शनिवारी ग्रामीण पोलिसांना रेल्वे स्थानकावर म्हैस चोरणारा आरोपी हा फिरत असल्याची माहिती मिळाली. माहिती मिळताच ग्रामीण पोलीस स्टेशनच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेतील कर्मचाऱ्यांनी तातडीने रेल्वे स्टेशन परिसर गाठला. त्या ठिकाणी शोधा शोध सुरू केली. मात्र चोरटा काही आढळून येत नव्हता. मोठ्या अक्कल हुशारीने तो चोरटा पसार झाला त्या चोरट्याला पोलिसांची चाहूल लागली होती. पोलिसांची चाहूल लागताच त्याने धूम ठोकली, आणि तब्बल दीड किलोमीटर अंतरावर एका गटारीत तो लपून बसला. मात्र तो लपत असताना एकाने पाहिले, आणि त्या संदर्भात त्याने पोलीस स्टेशनला चुगली केली. पोलिसांना लगेच इशारा समजला, पोलिसांनी घटनास्थळावर जाऊन गटारात लपलेल्या चोरट्याला बाहेर काढले. त्यावेळी त्याच्या अंगावर सर्वत्र घाण पसरली होती. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन जवळच असलेल्या गाड्या धुण्याच्या वॉशिंग सेंटरवर नेले, आणि मशीनच्या सहाय्याने त्याची स्वच्छता मोहीम राबवली. नंतर त्याला पोलीस स्टेशन येथे आणून रीतसर विचारपूस केली असता, त्याने आपले नाव अशोक काशिनाथ मुधाळे (वय 38 वर्ष रा. शिरूर अनंतपाळ ह. मुक्काम तेलगाव तालुका भालकी, जिल्हा बिदर) असे सांगितले.
उदगीर सह ग्रामीण भागातील विशेषत: तोगरी परिसरातील म्हशींची आपण चोरी केली असल्याची कबुली त्यांनी दिली आहे. त्याच्यावर रीतसर गुन्हा नोंद करून ज्येष्ठ पोलीस निरीक्षक राजकुमार पुजारी यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रगटिकरण शाखेचे पोलीस कर्मचारी नामदेव चेवले ,सचिन नाडागुडे, राजकुमार डबेटवार, राम बनसोडे, नाना उर्फ संतोष शिंदे यांच्या पथकाने केली आहे.
सध्या जनावरे ही शेतकऱ्यांचा आत्मा आहेत. गोहत्या प्रतिबंधक अधिनियम आल्यानंतर चोरटे जास्त करून म्हशी चोरून कत्तलखान्याकडे किंवा परराज्यामध्ये नेऊन विक्री करण्यावर भर देत आहेत. त्या दृष्टीने पोलिसांनी लावलेल्या या तपासाबद्दल जनतेमधून समाधान व्यक्त केले जात आहे.