लक्ष्मीनारायण मंदिराला चायनीज हॉटेलचा विळखा

उदगीर (एल.पी.उगीले) उदगीर शहराच्या मध्यवस्तीच्या ठिकाणी लक्ष्मीनारायण मंदिर असून या मंदिरात दररोज हजारो भाविक भक्त येत असतात. मोठ्या भक्ती भावाने हे भक्त येतात खरे, मात्र मंदिरात येत असताना आंबेडकर चौकापासून मंदिराकडे येण्याच्या रस्त्यावर चायनीज हॉटेलचे बस्तान बसलेले आहे. जणू मंदिराच्या रस्त्याला विळखाच घातलेला आहे. हे सर्व मांसाहारी असून रस्त्यावरच ठेले थांबलेले असतात, शिवाय मांसाहारी वस्तू आणि उरलेले अन्न रस्त्यावरच टाकले जाते. अशा प्रकारामुळे या मंदिराचे पावित्र्य भंग पावत असून भाविक भक्ताच्या भावनेला ठेच पोहोचत आहे. मंदिराचे पावित्र्य धोक्यात येत असून भाविक भक्त परेशान झाले आहेत. तरी नगर पालिकेच्या प्रशासनाच्या वतीने तात्काळ याला पाबंद घालावा. अशी आग्रही मागणी निवेदनाद्वारे लक्ष्मीनारायण मंदिर संस्थानच्या वतीने मुख्याधिकारी नगरपरिषद यांना दिलेली आहे. त्याच्या प्रती मुख्यमंत्री, पालकमंत्री, जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, उपजिल्हाधिकारी यांनाही देण्यात आलेल्या आहेत. सदरील निवेदनावर विनोद टवानी, अमोल राठी, अमोल बाहेती, आनंद बजाज, श्रीनिवास सोनी, नंदकुमार मलशेट्टी, डोंगरे सूर्यकांत, अंबादास शेळके, दीपक दामूवाले, सुदाम ढोणे, माधव गौंड इत्यादींच्या स्वाक्षरी आहेत.