कपाळे गल्लीतील शंभू महादेव मंदिरात पंचधातूचे कवच अर्पण

उदगीर (एल.पी.उगीले): शहरातील कपाळे गल्ली येथील प्राचीन शंभू महादेव मंदिरात भक्तिभावपूर्ण सोहळा संपन्न झाला. कपाळे परिवाराच्या वतीने, विशेषतः माजी नगरसेवक मनोज कपाळे यांचे बंधू विनोद कपाळे यांच्या पुढाकाराने, मंदिरातील शिवलिंगाला पंचधातूचे भव्य कवच विधीवत अर्पण करण्यात आले.
या मंगल सोहळ्यासाठी श्री गुरु हावगीस्वामी मठ येथून श्री श्री १०८ शंभूलिंग शिवाचार्य महाराज आणि इतर मान्यवर शिवाचार्य यांची रथातून मिरवणूक काढण्यात आली. यामध्ये २०० पेक्षा अधिक महिला भगिनींनी डोक्यावर कलश घेऊन,टाळ मृदंगाच्या गजरात आणि भक्तीमय गाण्यांच्या सुरावटीत पावले टाकत सहभाग घेतला. त्यांनी अर्पणासाठी आणलेल्या पंचधातूच्या शिवलिंग कवचासह मिरवणूक पार पडली.
मिरवणुकीनंतर कवच श्री शंभू महादेव मंदिरात आणून, उपस्थित शिवाचार्यां च्या हस्ते वेदमंत्रोच्चारासह शिवलिंगा वर बसवण्यात आले. त्यानंतर मंगल आरती व धर्मसभेचे आयोजन करण्यात आले.
धर्मसभेत शिवाचार्यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, “कोरोना काळात इतर धर्मीय उपासना बंद असतानाही लिंगायत धर्माची उपासना अखंड सुरु होती. आत्मा म्हणजेच लिंग समजणारा हा समाज आहे, यामुळे लिंगायत धर्माचा खरा महिमा समजतो.”
कपाळे कुटुंबीयांनी आयोजित केलेला हा ऐतिहासिक सोहळा श्रद्धाळूंसाठी भक्ती, एकता आणि अध्यात्मिक उन्नतीचा अनुभव घेऊन आला.