वसुंधरा दिनानिमित्त प्लास्टिक प्रदूषणावर कला शिक्षकांचा अनोखा उपक्रम

उदगीर (एल.पी.उगीले)
श्री पांडुरंग विद्यालय, कल्लूर येथे जागतिक वसुंधरा दिनाच्या निमित्ताने पर्यावरण वाचवा, वसुंधरा सजवा या उपक्रमांतर्गत कला शिक्षक नादरगे चंद्रदीप यांनी पोस्टर च्या माध्यमातून “प्लास्टिक मुक्त पर्यावरण” या विषयी विद्यार्थ्यांना माहिती सांगितली.
या उपक्रमाचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे, कला शिक्षक नादरगे चंद्रदीप यांनी विद्यार्थ्यांना प्लास्टिक कचऱ्याचे पर्यावरणावर होणारे गंभीर परिणाम सांगून प्रत्यक्ष उदाहरणांच्या माध्यमातून प्लास्टिकमुळे होणारे जलप्रदूषण, मातीतील घटकांची हानी, वन्यजीवांचे होणारे नुकसान तसेच मानवी आरोग्यावरील विपरीत परिणाम याचे सखोल विवेचन पोस्टरच्या माध्यमातून केले.
या कार्यक्रमात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी प्लास्टिकच्या पुनर्वापरातून कलाकृती तयार करून पर्यावरण स्नेही संदेश दिला. या अगोदरही शाळेत प्लास्टिक पिशवी ऐवजी कागदी पिशव्यांचा वापर करणे हा उपक्रमही विद्यालयात घेण्यात आला होता.
मुख्याध्यापक नादरगे एस.व्ही. यांनी विद्यार्थ्यांच्या आणि कला विभागाच्या उपक्रमाचे कौतुक करताना सांगितले, “प्लास्टिक प्रदूषण ही जागतिक समस्या आहे. विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाविषयीची जाण व कर्तव्यभावना विकसित होणे हे अत्यंत गरजेचे आहे. अशा उपक्रमांद्वारे पर्यावरण संरक्षणाची बीजे रोवली जात आहेत.”
कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी विद्यार्थ्यांनी आपण आपल्या दैनंदिन जीवनात प्लास्टिकचा वापर टाळून इतरांनाही त्यासाठी प्रोत्साहित करून परिसर स्वच्छता आणि प्लास्टिक ला आळा बसवण्याचा संकल्प केला.