लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेऊन विकल्या प्रकरणीउच्च न्यायालयात जामीन

0

छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी)
छत्रपती संभाजीनगर येथे उच्च न्यायालयाचे न्या. श्री. मेहरोज पठाण यांनी गुन्हा रजिस्टर क्र. १८६/२०२५ विसारवाडी पोलीस स्टेशन जिल्हा नंदुरबार कलम १३७ (२), १४३, ३ (५) भारतीय न्याय संहिता २०२३, या गुन्ह्यामध्ये आरोपी किरीटभाई सुलेमानभाई वनकर यांचा जामीन अर्ज मंजूर केला आहे. प्रकरणाची थोडक्यात माहिती अशी की, फिर्यादी यांनी दिनांक १६.०६.२०२५ रोजी विसारवाडी पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली की, फिर्यादीची मुलगी ही “मी कुणासोबत तरी लग्न करणार आहे” अशी माहिती मैत्रिणीला देऊन गुजरात राज्यात निघून गेली, व तिला कोणीतरी अज्ञात इसमाने लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेले आहे. व त्यानंतर तिची विक्री केली आहे, असा आरोप पोलिसात करण्यात आला होता. आरोपी यांना पोलीस स्टेशन विसारवाडी यांनी अटक केली. आरोपींनी सत्र न्यायालय नंदुरबार येथे दोषारोप दाखल केल्यानंतर आपला जामीन अर्ज दाखल केला असता सत्र न्यायालय नंदुरबार यांनी आरोपींचा जामीन अर्ज फेटाळला. सदर नाराजीने आरोपीने छत्रपती संभाजी नगर येथील उच्च न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला होता. सदर जामीन अर्जाच्या सुनावणीवेळी ॲड. अजिंक्य रेड्डी यांनी आरोपी तर्फे बाजू मांडताना न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले की, आरोपीवर कोणतेही प्रकारचे ठोस आरोप सदर फिर्यादीमध्ये नाहीत. फिर्यादीची मुलगी हीने गुजरात मध्ये लग्न केले. लग्न झाल्यानंतर लग्न घरी पाच दिवस राहिली, त्या पाच दिवसाच्या कालावधीमध्ये फिर्यादीच्या मुलीने कोणत्याही प्रकारची तक्रार दिली नाही, आणि कोणत्याही प्रकारचा बेबनाव तिच्यासोबत तिच्या लग्न घरी झालेला नाही. तसेच लग्नाच्या वेळी नोटरीसमोरील शपथपत्र होत असताना फिर्यादीच्या मुलीने कोणत्याही प्रकारचा विरोध नोटरीसमोर दर्शविला नाही. फिर्यादीची मुलगी हि नर्सिंग कोर्स करत असून सुशिक्षित आहे, सज्ञान आहे. सुशिक्षित, सज्ञान व्यक्तीने तिच्यावर होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात तात्काळ दाद मागणे नैसर्गिक आहे. तथापि फिर्यादीच्या मुलीचे वर्तन हे नैसर्गिक दिसून येत नाही. म्हणून संपूर्ण फिर्याद संशयास्पद आहे. फिर्यादीची मुलगी ही पाच दिवस लग्न घरी राहिली म्हणून फिर्यादीच्या मुलीला लग्न घरी विकल्याची फिर्याद ही धादांत खोटी आहे. अशा आशयाचा युक्तिवाद ॲड. अजिंक्य रेड्डी यांनी उच्च न्यायालयासमोर मांडला. सदर युक्तिवाद मान्य करत सदर प्रकरणी युक्तिवादाअंती उच्च न्यायालयाचे न्या. मेहरोज पठाण यांनी सदर प्रकरणी दोषारोप दाखल असून फिर्यादीच्या मुलीच्या जबाबाचे अवलोकन केले असता सदर जबाबाअंती सदर जबाबामध्ये आरोपीविरोधात सबळ ठोस भूमिका दिसून येत नसल्यामुळे आरोपीचा जामीन अर्ज मान्य केला, व जामीन मंजूर केली.
सदर प्रकरणी ॲड. अजिंक्य रेड्डी यांनी काम पहिले त्यांना ॲड विष्णू कंदे यांनी सहकार्य केलं.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!