कृषी पणन मंडळामार्फत शहरात मिलेट व फळ महोत्सवास प्रारंभ

0
कृषी पणन मंडळामार्फत शहरात मिलेट व फळ महोत्सवास प्रारंभ

महोत्सवात पांढरे जांभूळ, आंब्याच्या विविध १८ जाती व मिलेटचे १० विविध प्रकार

कोल्हापूर, दि. २२ (जिमाका): उत्पादक ते ग्राहक थेट विक्री योजनेंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांनी उत्पादित केलेले मिलेट्स व त्याचे पदार्थ, तसेच विविध फळांची विक्री होण्याच्या उद्देशाने कृषी पणन मंडळामार्फत भारत हाऊसिंग सोसायटी हॉल, राजारामपुरी या ठिकाणी २२ ते २६ एप्रिल या कालावधीमध्ये महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

या महोत्सवाचे उद्घाटन विभागीय कृषी सहसंचालक बसवराज मास्तोळी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर जिल्हा उपनिबंधक नीलकंठ करे, जिल्हा कृषी अधिकारी जालिंदर पांगारे, पणन मंडळाचे उपसरव्यवस्थापक डॉ. सुभाष घुले, हिंदकेसरी दीनानाथ सिंह आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना श्री. मास्तोळी म्हणाले, या महोत्सवामुळे शेतकऱ्यांच्या मालाला बाजारपेठ मिळवून देण्यास मदत होईल. पणन मंडळाने अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर अथवा तत्पूर्वी कोल्हापूर शहरात आंबा महोत्सवाचे आयोजन करावे, जेणेकरून आंबा उत्पादकांना मोठ्या प्रमाणावर व्यासपीठ उपलब्ध होईल. या फळ व मिलेट महोत्सवाचा लाभ जिल्हावासीयांनी घ्यावा, असे आवाहनही त्यांनी याप्रसंगी केले.

डॉ. सुभाष घुले प्रास्ताविक करताना म्हणाले की, आजचा महोत्सव हा कृषी पणन मंडळाचा ‘रौप्य महोत्सव’ असून या उपक्रमात राज्यातील ११ जिल्ह्यांतून शेतकरी सहभागी झाले आहेत. या उपक्रमामुळे उत्पादक व ग्राहक यांच्यात थेट खरेदी होत असल्याने त्यांना दर्जेदार उत्पन्न मिळण्यास मदत होते.

यावेळी पणन मंडळाच्या वतीने तयार करण्यात आलेल्या “पौष्टिक तृणधान्य पाककृती” पुस्तिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. त्याचबरोबर खानापूर येथील प्रगतशील शेतकरी विजय मोरे यांनी आंब्याच्या विविध जाती विकसित केल्याबद्दल त्यांचा आणि प्रसिद्ध रांगोळीकार शिवाजी जेऊरकर यांचा पुष्पगुच्छ देऊन प्रमुख अतिथींच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

पाच दिवस चालणाऱ्या या महोत्सवामध्ये राज्यातील विविध प्रकारच्या मिलेटचे उत्पादन घेणारे शेतकरी तसेच आंबा, डाळिंब, स्ट्रॉबेरी, अंजीर, पेरू आदी फळे ग्राहकांसाठी उपलब्ध आहेत. या महोत्सवाची वेळ सकाळी ९ ते रात्री ९ अशी आहे. या प्रदर्शनात मिलेट व फळांचे तब्बल ४५ विविध स्टॉल आहेत. मानवी आरोग्याच्या दृष्टीने २३ तारखेपासून ‘मिलेटचे महत्त्व’ यावर डॉ. संदीप पाटील, डॉ. अहिल्या वाघमोडे, डॉ. योगेश बन व डॉ. प्रतिभा ठोंबरे इ. आहारतज्ज्ञांची व्याख्याने आयोजित करण्यात आली आहेत.

यावेळी बबनराव रानगे, दत्ताजीराव वारके यांच्यासह अनेक प्रयोगशील शेतकरी व ग्राहक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार सुयोग टकले यांनी मानले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!