अवैध गुटखा वाहतूक प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, वाहनासह ८.३९ लाखांचा मुद्देमाल जप्त.

0
अवैध गुटखा वाहतूक प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, वाहनासह ८.३९ लाखांचा मुद्देमाल जप्त.

लातूर (एल पी उगीले) महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या तंबाखूजन्य पदार्थांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्याच्या उद्देशाने पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांचे निर्देशांवर, अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांचे मार्गदर्शनात लातूर जिल्हा पोलीस दल सतत सक्रिय असून, याच अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेने एक मोठी कारवाई करून अवैध गुटखा वाहतूक प्रकरण उघडकीस आणले आहे.
दि. २३ एप्रिल २०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पोलीस पथक अवैध धंद्यांविरोधात गुप्त माहिती संकलन व कारवाईसाठी लातूर जिल्ह्यात पेट्रोलिंग करीत होते. सकाळी सुमारे ९:०० वा. पथकाला माहिती मिळाली की, रेनापुर फाटा ते रेणापूर गावाकडे जाणाऱ्या मार्गावरून एक पांढऱ्या रंगाची स्विफ्ट डिजायर कार (क्रमांक MH 44 G 2994) मधून प्रतिबंधित गुटखा वाहतूक केली जाणार आहे.
प्राप्त माहितीची खातरजमा करून पोलीस पथकाने नियोजनबद्ध पद्धतीने सापळा रचला. काही वेळातच नमूद वाहन घटनास्थळी येताच पोलिसांनी तत्परतेने कार थांबवून तपासणी केली. सदर कारमधून चालकास ताब्यात घेऊन त्याची ओळख अमर श्रीकांत लकडे (वय २८ वर्षे, रा. बोरवटी, ता. जि. लातूर) अशी पटली.
यानंतर कारची सखोल झडती घेतली असता, वाहनामध्ये विविध प्रकारचे महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेले तंबाखूजन्य पदार्थ मोठ्या प्रमाणात आढळून आले. यामध्ये विमल पान मसाला, वी-१ तंबाखू, रजनीगंधा पान मसाला व रत्ना ३००० सुगंधीत तंबाखू असा एकूण अंदाजे २,३९,५८४/- रुपये किंमतीचा गुटखा साठा मिळून आला. तसेच या अवैध वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली मारुती सुझुकी स्विफ्ट डिजायर कार (अंदाजे किंमत ६,००,०००/- रुपये) जप्त करण्यात आली. अशा प्रकारे एकूण ८,३९,५८४/- रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे.
या प्रकरणी आरोपी अमर श्रीकांत लकडे याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम १२३, २७४, २७५, २२३ तसेच अन्न सुरक्षा व मानके अधिनियम, २००६ अंतर्गत कलम ५९ प्रमाणे रेनापुर पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास रेनापुर पोलीस करीत आहेत.
सदर कारवाई वरिष्ठांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथकामधील पोलीस उपनिरीक्षक अमर केंद्रे, पोलीस हवालदार अर्जुन राजपूत, रियाज सौदागर, साहेबराव हाके, मुन्ना मदने, आनंद हल्लाळे व प्रविण कोळसुरे यांनी पार पाडली.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!