विद्यार्थीप्रिय,संवेदनशील व सात्विक व्यक्तिमत्व – स्व.भगवानसिंह बायस गुरुजी

विद्यार्थीप्रिय,संवेदनशील व सात्विक व्यक्तिमत्व - स्व.भगवानसिंह बायस गुरुजी

वंदनीय उदागीर महाराजांच्या वास्तव्याने पावन झालेल्या तथा ऐतिहासिक व अध्यात्मिक पार्श्वभूमी असलेल्या उदगीर शहरात सर्वांसाठी शिक्षण,मानवताधर्माची शिकवण व सर्वसमावेशक विचारांची पेरणी ज्या काही महनीय व्यक्तिमत्त्वांनी केली त्यामध्ये स्व.भगवानसिंह बायस गुरुजी यांचा मोठा सहभाग होता.

विश्व स्नेह का ध्यान धरे। सबका सब सन्मान करे।। या राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या वचनाप्रमाणे
शिक्षक व संस्था चालक अशा भुमिकेतुन कार्य करणाऱ्या बायस गुरुजींचा उत्तम प्रशासक,संवेदनशील, विद्यार्थी प्रिय,सात्विक,लोभस व्यक्तिमत्व अशा अनेकविध विशेषणांनी निश्चितपणे उल्लेख करता येऊ शकतो.

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक,आर्थिक व सामाजिक व सांस्कृतिक अडीअडचणी मध्ये धावून जाणे आणि त्या सोडवताना प्रसंगी तन-मन-धनाने सहकार्य करणे ही स्व.बायस गुरुजींची हातोटी होती.महाराष्ट्रातल्याच नाही तर सीमावर्ती कर्नाटक आंध्र प्रदेश इत्यादी राज्यातून आलेल्या विद्यार्थ्यांना एक मोठा आधारवड आणि पालक म्हणून स्व.बायस गुरुजी यांची ओळख होती.

जे जे आपणासी ठावे तेथे इतरांसी सांगावे या पद्धतीने ज्ञानाची गंगा विद्यार्थ्यांपर्यंत निशुल्क पोहोचवतानाच विद्यार्थ्यांना सामाजिक बांधिलकी व नीतिमूल्यांची जाण सुद्धा करून देण्याचं अत्यंत पवित्र कार्य केलेले आहे. इंग्रजी सारखा विषय अत्यंत सहज,सोप्या व समजणाऱ्या पद्धतीने शिकवताना गुरुजींनी विद्यार्थ्यांमध्ये त्या विषया बद्दलची अनास्था व भीती सुद्धा दूर करण्याचं कार्य केलेलं आहे.

साधु संत येती घरा तोचि दिवाळी दसरा असा अनुभव ज्यांच्या घरी गुरुजी जात असत त्या प्रत्येक नागरिक व विद्यार्थ्यांमध्ये जाणवत असे.बायस गुरुजीं प्रती निर्माण झालेला आदरभाव हा त्यांनी विद्यार्थ्यां प्रती जपलेली आपुलकी,जिव्हाळा,स्नेह व प्रेम याचीच पावती आहे याबद्दल माझ्या मनात तिळमात्र शंका नाही.

कामावर निष्ठा व कर्तुत्वावर आढळ श्रद्धा या पद्धतीने सेवारत राहणाऱ्या गुरुजींचं जीवन सर्वांसाठी आदर्शवत व अनुकरणीय असेच राहिले आहे.त्यामुळे विविध पुरस्कार किंवा सन्मान याची कसलीही अपेक्षा न करता निष्काम भावनेतून कार्य करणारे गुरुजी हे अद्वितीय व्यक्तिमत्व होते.

गुरुजींच्या चांगुलपणाचा,सहकार्याचा व निस्वार्थ भावनेचा अनेक वेळा स्वतःच्या फायद्यासाठी सोयीस्करपणे उपयोग करणाऱ्या व्यक्तींबद्दल सुद्धा त्यांनी दुजाभाव न बाळगता दयाभावच बाळगल्याचे अनेक प्रसंगी निदर्शनास आले आहे.

अनेक वेळा जिकिरीच्या प्रसंगी समाजामध्ये स्नेह आणि बंधुभाव कायम राहीले पाहिजे यासाठी सुद्धा त्यांची भूमिका महत्त्वपूर्ण अशीच राहिली आहे.

विविध शासकीय, निमशासकीय व खाजगी पदांच्या माध्यमातून गोरगरीब गरजू व्यक्तींसाठी गुरुजींनी केलेले कार्य हे इतरांसाठी प्रेरणास्त्रोत अशा स्वरूपाचे आहे.

बाळ भगवान शिक्षण प्रसारक मंडळ,अहमदपूर या शैक्षणिक संस्थेमध्ये अध्यक्षपदी असलेले माजी राज्यमंत्री मा.बाळासाहेबजी जाधव,सचिवपदी असलेले आमदार मा.बाबासाहेबजी पाटील,सहसचिव मा. अविनाशजी जाधव व सर्व सन्माननीय संचालक मंडळासोबत उपाध्यक्षपदाच्या माध्यमातून दिलेले योगदान याची प्रचिती व अनुभुती निश्चितपणे अनेकांना आलेली आहे.

विद्यार्थी हा केवळ परीक्षार्थी न बनता तो ज्ञानार्थी बनला पाहिजे याकरिता विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी झटणारे गुरुजी प्रत्येकाच्या मनामनात घर करून राहिले आहेत.

शालेय शिक्षण संपल्यावरही देशविदेशात विविध पदांवर कार्यरत असलेल्या सर्व विद्यार्थी-विद्यार्थिनींच्या स्मरणात व मनात आजतागायत आहेत ही त्यांनी वेळोवेळी केलेली मदत अथवा कठीण प्रसंगी चोवीस तास धावून येणे व उपलब्ध असणे या कारणामुळे आहे.

स्व.बायसगुरुजींनी केलेले अनमोल मार्गदर्शन आणि स्वतःच्या अनुभवातून दिलेली शिदोरी आज सुद्धा आम्हाला सार्वजनिक जीवनामध्ये काम करताना उपयोगी पडते व त्या प्रत्येक वेळी त्यांची आठवण येते.

गुरुजी आम्हा सर्वांना आपला सार्थ अभिमान वाटतो व आपल्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी व उणीव कधीही भरून येणार नाही हे प्रकर्षाने जाणवते.

ऋषितुल्य व पितृतुल्य व्यक्तिमत्त्वाचे मानकरी असलेल्या स्व.भगवानसिंह बायस गुरुजींच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या प्रतिमेस विनम्र अभिवादन व भावपूर्ण श्रद्धांजली.

डॉ.दत्तात्रय विनायकराव पाटील,प्राचार्य,धन्वंतरी आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज,उदगीर,जिल्हा:-लातूर(महाराष्ट्र)

About The Author