ऊन वारा पाऊस याची तमा न बाळगता पॅंथरची रॅली चालूच

0
ऊन वारा पाऊस याची तमा न बाळगता पॅंथरची रॅली चालूच

उदगीर (एल.पी. उगीले) महाराष्ट्र शासनाने आरक्षणाचे उपवर्गीकरण लागू करू नये. या प्रमुख मागणीसाठी बीड पासून मुंबई पर्यंत पायी लॉन्ग मार्च सुरू करण्यात आला आहे. पॅंथरच्या चळवळीतून गेल्या 30 वर्षापासून सक्रिय असलेले निवृत्तीराव सांगवे हे या पायी रॅलीमध्ये सहभागी झाले आहेत.
विकासाची संकल्पना गेल्या पंधरा वर्षापासून नगरपालिकेच्या माध्यमातून उदगीर शहरात राबवणारे आणि दलित पॅंथर, राष्ट्रीय दलित अधिकार मंच, निळे वादळ इत्यादी संघटनात्मक चळवळीतून समाज प्रबोधन आणि समाजावर होणाऱ्या अन्यायाला प्रतिकार करण्यासाठी नेहमी लढवय्यी भूमिका घेणारे निवृत्तीराव सांगवे हे या रॅलीचे एक प्रमुख आकर्षण आहे. असे म्हटले तर वावगे होणार नाही. महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यातून नेतेमंडळी या रॅलीमध्ये सहभागी होत आहेत. उपवर्गीकरणारा विरोध करणाऱ्या सर्वच घटकांकडून या लॉंग मार्चचे ठिकठिकाणी स्वागत आणि अभिनंदन केले जात आहे.
उपवर्गीकरण थांबवावे आणि समाजातील तेढ वाढणार नाही, याची जबाबदारी शासनाने घ्यावी. असे आवाहन या रॅलीच्या माध्यमातून करण्यात आले आहे. उपवर्गीकरणाच्या समितीने जी अ ब क ड वर्गीकरणाची पद्धत सांगितली आहे, त्यामध्ये महार समाजाला शेवटच्या टप्प्यात ठेवले आहे. म्हणजेच एका अर्थाने विकासाच्या प्रवाहात महार समाज येऊच नये. अशा पद्धतीचे षडयंत्र रचले जात असल्याचा आरोपही नगरसेवक निवृत्तीराव सांगवे यांनी केला आहे.

चौकट…..
शासनाला जाती-जातीत भांडणे लावायचे आहेत काय ? – निवृत्तीराव सांगवे

उपवर्गीकरणामुळे विविध जाती समूहामध्ये अंतर्गत वाद आणि तणाव निर्माण होऊ शकतो. त्यामुळे सामाजिक ऐक्याला तडे जाऊ शकतात, तसेच मोठ्या प्रमाणात जाती-जातीमध्ये भांडणे होऊ शकतात. या गोष्टीचे गांभीर्य विचारात घेऊन उपवर्गीकरणाला फाटा द्यावा. अशा पद्धतीची ही प्रमुख मागणी आपण करत असल्याचे निवृत्तीराव सांगवे यांनी सांगितले आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांनी शासनाला विनंती केली आहे की, सामाजिक ऐक्याला तडे जाणार नाहीत याची दक्षता घेण्याची जबाबदारी सरकारची आहे.
यासोबतच या उपवर्गीकरणाच्या माध्यमातून राजकीय गैरवापर होण्याची शक्यता आहे. आरक्षणाचे लहान तुकडे केल्याने राजकीय फायद्यासाठी विशिष्ट जातींना खुश करण्याचे प्रयत्न वाढू शकतात, आणि ध्रुवीकरण होऊ शकते. ही गोष्ट समाजासाठी घातक आहे. वास्तविक पाहता, ज्या कमिटीने उपवर्गीकरण अ ब क ड सांगितले आहे. त्यामध्ये महार समाज ड प्रवर्गात ठेवला आहे. याचाच अर्थ सर्वात कमी आरक्षणाचा फायदा महार समाजाला व्हावा. अशा पद्धतीचे षडयंत्र रचले गेले आहे. तर सर्वात जास्त फायदा महार समाजाच्या बरोबरीने जातीय संख्या असलेल्या मातंग समाजाला अ वर्गात ठेवले आहे. वास्तविक पाहता प्रत्येक राज्याची जात निहाय आकडेवारी गोळा करणे आणि त्यानुसार कोठा ठरवणे अत्यंत गुंतागुंतीचे आणि वादातीत ठरू शकते. या गोष्टीचेही गांभीर्य सरकारने विचारात घेणे गरजेचे आहे. आता न्यायालयाच्या आदेशाने जर उपवर्गीकरण लागू करायचे असेल तर आज घडीला कोणत्याही राज्याला त्यांच्याकडे प्रत्येक जातीचे मागासलेपण आणि त्यांचे लाभ घेतलेले यांची संख्या उपलब्ध नाही. त्यामुळे आरक्षणाच्या तुकड्यामुळे अनुसूचित जातीमध्ये एकतेला तडे जाऊन बौद्ध विरोध मातंग किंवा इतर पोट जातीमध्ये अंतर्गत स्पर्धा आणि सामाजिक तेढ वाढण्याचा धोका निर्माण होऊ शकतो, आजच तो धोका काही प्रमाणात निर्माण झालेला आहे. त्यासोबतच दलित मतपेटीचे विभाजन होऊन वेगवेगळ्या जाती स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी स्वतंत्र दबाव गट तयार करू शकतात. याचाही विचार सरकारने करावा, आणि उपवर्गीकरणाला तिलांजली द्यावी. अशी आग्रही मागणी पॅंथर नेते निवृत्तीराव सांगवे यांनी केली आहे.
उपवर्गीकरण हा विचार करण्यापूर्वी नोकऱ्यामधील प्रतिनिधित्व सिद्ध करणे गरजेचे आहे. त्यासाठी सखोल सांख्यिकी डेटा असणे बंधनकारक आहे. त्यामुळे जोपर्यंत अचूक जातीनिहाय सर्वेक्षण होत नाही, तोपर्यंत नेमकी कोणती जात कोणत्या गटात जाईल? आणि कोणाला किती टक्के मिळेल? हे निश्चित सांगणे कठीण आहे. असे असताना देखील बदर समिती किंवा भास्कर आयोगाच्या (लहुजी साळवे) शिफारसी बद्दल पुन्हा एकदा विचार करणे गरजेचे झाले आहे.
सध्या गुण्या गोविंदाने महाराष्ट्रामध्ये सर्व दलित नांदत आहेत. मात्र उपवर्गीकरणाचे कोलीत लावून सरकार लहान लहान मागास जातीमध्ये भांडणे लावत आहे. शासनाने यापूर्वीही अनेक वेळा फोडा आणि झोडा ही राजनीती अवलंबून सत्ता स्थापित केली आहे. कधी हिंदू विरुद्ध मुसलमान तर कधी मराठा विरुद्ध इतर समाज असे अनेक प्रयत्न झाले मात्र महाराष्ट्रातील गुण्यागोविंदाने नांदू इच्छिणाऱ्या जनतेने शासनाच्या या षडयंत्राला ओळखून शासनाचा डाव कोलून टाकला. त्याच पद्धतीने पुन्हा एकदा बुद्धिजीवी मागासवर्गीयांनी या उपवर्गीकरणाचा हट्ट न करता आपण ज्या पद्धतीने गुन्या गोविंदाने आहोत, एकजुटीने आहोत, त्याच पद्धतीने कायम राहू. असे आवाहनही पँथर नेते निवृत्तीराव सांगवे यांनी केले आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!