शेतकर्‍यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी

शेतकर्‍यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी

जिल्हा भाजपाच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत आ. संभाजीराव पाटील निलंगेकर

लातूर (प्रतिनिधी) : मराठवाड्यात गेल्या पंधरवड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. खरीपाचे पीक शंभर टक्के वाया गेले आहेत. सोयाबीन, कापूस ही पिके हातची गेली तर ऊस आडवा झाला आहे. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. पूर स्थितीमुळे जमिनी खरवडून गेल्या आहेत. अशा संकटातून शेतकऱ्यांना सावरण्यासाठी राज्यातील महाविकास आघाडी सरकारने हेक्टरी ५० हजार रुपये मदत तातडीने करावी अशी मागणी लातूर जिल्‍हा भाजपाच्‍या वतीने आयोजित करण्‍यात आलेल्‍या पत्रकार परिषदेत माजी मंत्री आ. संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी केली. यावेळी भाजपाचे जिल्‍हाध्‍यक्ष आ. रमेशअप्‍पा कराड, आ. अभिमन्‍यु पवार, जिप अध्‍यक्ष राहूल केंद्रे, सरचिटणीस संजय दोरवे, किरण उटगे यांच्‍यासह अनेकांची उपस्थिती होती.

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आज व उद्या मराठवाड्याच्या दौर्‍यावर येत आहेत. गेल्या दोन वर्षात मराठवाड्याच्या विकासासाठी ठोस पावले न उचलता तुटपुंज्या निधीची तरतूद करणारे हे महाविकास आघाडी सरकार मराठावाडा विरोधी असल्याचा आरोप करत गेल्या वर्षी अतिवृष्टीने मराठवाड्यातील शेतकर्‍यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. या नुकसानीची पाहणी करण्याकरीता आलेल्या मुख्यमंत्र्यांनी हेक्टरी ५० हजार रुपयांच्या मदतीची घोषणा केली होती. ही मदत तर दूरच पण हक्काचा असणारा पीकविमा सुध्दा सरकारच्या दुर्लक्षामुळे शेतकर्‍यांना मिळालेला नाही. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना मराठवाड्यात फिरण्याचा नैतिक अधिकार नाही, अशी टिका आ. निलंगेकरांनी केली आहे.

महाविकास आघाडी सरकारने गेल्या दोन वर्षात केवळ आश्‍वासनांचा पाऊस मराठवाड्यातील जनतेवर केला आहे. त्यामुळे या दोन वर्षात मराठवाड्याचा विकास खुंटला आहे. संपूर्ण मराठवाड्यासाठी वार्षिक नियोजन आर्थिक आराखड्यात केवळ ६०० कोटी रुपयांची तरतूद या सरकारने केली असून याच सरकारने पश्‍चिम महाराष्ट्रातील एका जिल्ह्याकरीता ११०० कोटी रुपयांची केलेली तरतूद मराठवाड्यासाठी अन्यायकारक आहे. विशेष म्हणजे मराठवाड्यातील पाच ते सहा जण या आघाडी सरकारमध्ये मंत्री म्हणून काम करीत असले तरी त्यांनी सरकारच्या या मराठवाडा विरोधी भूमिकेबद्दल एकही शब्द न बोलणे हे मराठवाड्यातील जनतेसाठी अन्यायकारक असल्याचेही आ. निलंगेकर यांनी यावेळी स्पष्ट केले.

गतवर्षी अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यास आलेल्या मुख्यमंत्र्यांनी हेक्टरी ५० हजार रुपयांच्या मदतीची घोषणा केली होती. मात्र अद्यापपर्यंत यातील एक दमडीही मिळालेली नसून हक्काचा पीकविमाही मिळालेला नाही. याहीवर्षी अतिवृष्टीने मराठवाड्यातील २५० मंडळातील २५० लाख हेक्टर्सवरील पिके पाण्याखाली गेली असून एकही मंत्री अद्याप शेतकर्‍यांच्या नुकसानीची माहिती घेण्यासाठी बाहेर पडल्याचे दिसले नाही. लहान मोठी शेकडो जनावरे दगावली आहेत. अनेक पक्की घरे पडली आहेत. एवढी भयानक परिस्थिती मराठवाड्याने आजवर कधीच अनुभवली नव्हती. खरे तर ही परिस्थिती पाहता राज्य सरकारने तातडीने ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना बांधावर जाऊन मदत द्यायला हवी होती. मात्र तसे घडले नाही. आघाडी सरकारने नुकसान अहवालाची वाट न पाहता शेतकर्‍यांना तात्काळ सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

यावेळी जिपचे सभापती रोहीदास वाघमारे, शिवाजीराव केंद्रे, शैलेश गोजमगुंडे, डॉ. बाबासाहेब घुले, दिलीप धोत्रे, ज्ञानेश्‍वर चेवले, शिरीष कुलकर्णी, दिग्‍वीजय काथवटे, देवा गडदे, सतिष अंबेकर यांच्‍यासह अनेक भाजपाचे लोकप्रतिनिधी, पदाधिकारी उपस्थित होते.

About The Author