ग्रंथालयांनी शासकीय योजनांचा लाभ घ्यावा – सुनील हुसे

ग्रंथालयांनी शासकीय योजनांचा लाभ घ्यावा - सुनील हुसे

उदगीर (एल.पी.उगीले) : मराठवाडा विभागातील सार्वजनिक ग्रंथालयांनी शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा, आणि आपले ग्रंथालय समृद्ध करावे. जेणेकरून वाचनसंस्कृती समृद्ध होईल. अशी अपेक्षा औरंगाबाद विभागाचे सहाय्यक ग्रंथालय संचालक सुनील हुसे यांनी व्यक्त केली.
ते उदगीर तालुक्यातील शेकापुर येथील सावित्रीबाई फुले सार्वजनिक वाचनालयाच्या इमारतीचा लोकार्पण सोहळा प्रसंगी उद्घाटक म्हणून बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लातूर जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुनील गजभारे हे होते. सर कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून मराठवाडा विभाग ग्रंथालय संघाचे अध्यक्ष राम मेकले, लातूर जिल्हा ग्रंथालय निरीक्षक सोपान मुंडे, जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष हावगीराव बेरकीळे, ग्रंथालय संघाचे उपाध्यक्ष ग्रंथमित्र सूर्यकांत शिरसे, औरंगाबाद विभागाचे सहाय्यक ग्रंथालय संचालक अधीक्षक अनिल बाविस्कर यांच्यासह ग्रंथालय चळवळीतील यशवंत कुलकर्णी, रामेश्वर बिरादार, अंकुश कोनाळे, जनार्दन सावंत, अशोक बिरादार, दिनेश पाटील, चंद्रकांत ढगे, गुप्तलिंग स्वामी, उदगीर तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष तथा ग्रंथालय चळवळीचे नेते रामभाऊ मोतीपवळे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना सुनील हुसे यांनी स्पष्ट केले की, ग्रामीण भागात सार्वजनिक ग्रंथालयाच्या अनेक अडचणी आहेत. या अडचणी विचारात घेऊन शासनाच्या वतीने या ग्रंथालयांना अर्थसहाय्य देण्याच्या उद्देशाने वेगवेगळ्या शासकीय योजना जाहीर केल्या आहेत. या योजनांचा लाभ जास्तीत जास्त ग्रंथालयांनी घ्यावा. जेणेकरून ग्रंथालय समृद्ध होतील आणि ग्रंथालय निर्माण करण्यामागचा उद्देश सफल होईल. मराठवाडा विभागातील सर्वांसाठी आपण सतत सहकार्य करायला तत्पर आहोत. लातूर जिल्हा तर आपल्यासाठी विशेष आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी शासकीय योजनांच्या माहितीसाठी संपर्क करावा, आणि या योजना पदरी पाडून घ्याव्यात असे आव्हान केले.
या प्रसंगी लातूर जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष बेरकीळे यांनी स्पष्ट केले की, सार्वजनिक ग्रंथालयांना अत्यंत तुटपुंजे अनुदान आहे. केवळ सेवाभावी वृत्तीने ग्रंथालयीन कर्मचारी काम करत आहेत. मात्र 2012 पासून ग्रंथालयीन कर्मचार्‍यांच्या अडचणी, वेतन वाढ अर्थात मानधनवाढ झालेली नाही. या गोष्टीचे गांभीर्याने विचार करून समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन केले.
ग्रंथमित्र सूर्यकांत शिरसे यांनी आपल्या भाषणातून स्पष्ट केले की, सध्या शासनाच्या योजनांची माहिती पूर्वी इतक्या कठीण नाहीत, सध्या सर्व काही ऑनलाईन झाल्यामुळे सोपे झाले आहे. ग्रंथालयीन कर्मचार्‍यांनी आणि कार्यकर्त्यांनी आपले ज्ञान विकसित करावे. संगणकीकरण झालेले आहे, त्यामुळे जास्तीत जास्त ऑनलाइन प्रस्ताव पाठवून शासकीय योजनांचा लाभ घ्यावा असे सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सावित्रीबाई फुले सार्वजनिक वाचनालय शेकापुरचे अध्यक्ष लक्ष्मण फुलारी यांनी केले. सूत्रसंचालन रामभाऊ मोतीपवळे यांनी तर आभरप्रदर्शन दीपक भालके यांनी केले

About The Author