शेतकरी महावितरणचे देणेच लागत नाही – सिमा नरोडे

शेतकरी महावितरणचे देणेच लागत नाही - सिमा नरोडे

औसा (प्रतिनिधी) : सध्या अचानकपणे पूर्वसूचना न देता वसुलीच्या नावाखाली विजपुरवठा खंडित करण्याची कार्यवाही महावितरण करत आहे. हा प्रकार पुर्णतः बेकायदेशीर असून शेतकरी महावितरणचे देणे लागत नाही,तर महावितरणच शेतकऱ्यांचे पैसे देणे लागत असल्याची माहीती शेतकरी संघटना महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा सिमाताई नरोडे यांनी औसा तालुक्यातील महादेववाडी येथे शेतकरी नेते शरद जोशी यांच्या स्मृतीदिनानिमित्त आयोजित शेतकरी मेळाव्यात दिली.
देशातील शेतकऱ्यांना इतर नागरीकांप्रमाणे सुखाने व सन्मानाने जगता यावे. याकरीता शेतीमाला रास्त भाव मिळणे आवश्यक आहे. आणी त्यासाठी त्यांना बाजारपेठेचे व तंत्रज्ञानाचे स्वातंत्र्य मिळाले पाहिजे. यासाठी शरद जोशींनी शेतकरी संघटनेची स्थापना केली.व शेतकऱ्यांमध्ये लढाईचे स्फुल्लिंग पेटविले. परंतु आजपर्यंत सत्तेवर आलेल्या सर्व सरकारांनी स्वातंत्र्य न देता वेगवेगळ्या चुकीच्या धोरणांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना लूटण्याचेच काम केले आहे. म्हणून सरकारचे धोरण हेच शेतकऱ्यांचे मरण आहे म्हणून शेतकरी सरकारचे कोणतेही देणे लागत नाही असे सांगून ‘कर कर्जा नाही देंगे, बिजलीका बील भी नहीं देंगे’ ही घोषणा दिली.

शेतकऱ्यांना कृषी मुल्य आयोग शेतीमालाच्या उत्पादन खर्चात विज बिल धरत नाही, २००४ सालापासून राज्य शासनाने शेतकऱ्यांना सवलतीच्या दरात विज पुरवठा करण्याचे धोरण राबवत आहे.त्यानुसार सरकार महावितरणला शेतकऱ्यांच्या नावे अनुदान देते. परंतू महावितरण अनुदानाच्या पैशाएवढीही विज शेतकऱ्यांना देत नाही. तर उलट क्राॅस सबसिडी जास्त घेण्यासाठी तिन अश्वशक्तीच्या पंपाला पाच अश्वशक्तीचे, पाच अश्वशक्तीला साडे सातचे बिल दिले आहे.यामुळे महावितरण कडूनच शेतकऱ्यांच येणं आहे. संबंधीत शेतकऱ्यांना पंधरा दिवस आधी लेखी सुचना दिल्याशिवाय विज पुरवठा खंडित करु नये असे विज नियामक कायदा २००३ मध्ये तरतूद असताना महावितरण शेतकऱ्यांना कोणतीही पूर्वसूचना न देता सबस्टेशन वरुन किंवा रोहित्रावरुन विजपुरवठा खंडीत करुन कायद्याचे उल्लंघन करीत आहे. म्हणून यापुढे शेतकऱ्यांनी संघटीत होऊन महावितरणच्या अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांच्या धडा शिकवावा लागेल असे मत यावेळी व्यक्त केले. मेळाव्याचे प्रास्ताविक संघटनेचे युवा जिल्हाध्यक्ष रुपेश शंके यांनी केले. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून जेष्ठ नेते रमेश चिल्ले, जिल्हाध्यक्ष अशोक पाटील, उपाध्यक्ष कालिदास भंडे, वसंत कंदगुळे, बालाजी जाधव, किशोर बुरांडे, अजित धुमाळ, दत्तात्रय पाटील, अजिंक्य पाटील, रादास बंडे, योगीराज काळे, दगडूसाहेब पडिले, विवेक पाटील, दिलीप इंगळे, करण भोसले आदिंसह शेकडो शेतकरी उपस्थित होते.

About The Author