लातूर जिल्ह्यासाठी 299 कोटींची नुकसान भरपाई मंजूर
लातूर (प्रतिनिधी) : लातूर जिल्ह्यातील 4 लाख 62 हजार 991 शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री कृषी विमा योजनेअंतर्गत ऑनलाईन/ऑफलाइन पद्धतीने अर्ज सादर केले होते. अशा अर्ज केलेल्या शेतकऱ्यांचे पंचनामे करून त्याबाबतचा अहवाल विमा कंपनीने अंतिम करून अर्ज केलेल्या सर्व शेतकऱ्यांना रुपये 299 कोटी रुपयांची नुकसान भरपाई मंजूर केली असल्याचे जिल्हा कृषी अधिकारी लातूर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळवले आहे.
खरीप 2021 मधील लातूर जिल्ह्यातील 9 लाख 60 हजार 416 शेतकऱ्यांनी विमा भरलेला होता. माहे सप्टेंबर ऑक्टोबर या महिन्यांमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतामध्ये पाणी साठवू उभ्या पिकांचे नुकसान झाले होते. या संदर्भात विमा योजनेच्या तरतुदीनुसार नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीबाबत वैयक्तिक अर्ज करण्याबाबत कृषी विभाग व विमा कंपनीने आवाहन केले होते.
सदर नुकसानभरपाईचे वाटप ही शेतकर्यांच्या खात्यावर जमा करण्यात येत आहे. या संदर्भात शेतकर्यांना काही अडचणी असल्यास त्यांनी त्यांच्या तालुक्याचा विमा कंपनीच्या प्रतिनिधीशी संपर्क साधून माहिती घ्यावी असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी लातूर यांनी केलेले आहे.