कोरोना वर मात करण्यासाठी नियमित योगा आवश्यक – डॉ. दीपक बच्चेवार

कोरोना वर मात करण्यासाठी नियमित योगा आवश्यक - डॉ. दीपक बच्चेवार

रोल ऑफ फिजिकल एज्युकेशन अँड योगा फॉर मेन्टेनन्स ऑफ हेल्थ अँड फिटनेस अंडर कोविड-१९ ‘ या ग्रंथाचे प्रकाशन संपन्न

अहमदपूर (गोविंद काळे) : संपूर्ण जगाने महाभयंकर कोविड-१९ महामारी अनुभवली असून, अजूनही जग या महामारीतून पूर्णपणे सावरलेले नाही. या जागतिक महामारीचा सामना करुन कोरोना सारख्या गंभीर आजारांवर यशस्वी मात करण्यासाठी शारीरिक व मानसिक तंदुरुस्तीसाठी नियमितपणे योग आणि प्राणायाम करीत राहाणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे सहयोगी अधिष्ठाता व व्यवस्थापन परिषद सदस्य प्रा. डॉ. दीपक बच्चेवार यांनी केले. याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, ” ‘कोविड- १९’ च्या काळात आरोग्य संवर्धनासाठी शारीरिक शिक्षण आणि योगाची भूमिका ” या विषयावर येथील महात्मा फुले महाविद्यालयातर्फे प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या एक दिवसीय राष्ट्रीय ऑनलाइन चर्चासत्राच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. डी.डी. चौधरी हे होते, तर किसान शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव ज्ञानदेव झोडगे तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांची विशेष उपस्थिती होती. यावेळी पुढे बोलताना डॉ. बच्चेवार म्हणाले की, आरोग्यदायी जीवन जगण्यासाठी प्रत्येकाने नियमितपणे योगा आणि प्राणायाम केलाच पाहिजे. प्रचंड ताण तणाव असलेल्या या धकाधकीच्या काळात मानसिक आणि शारीरिक आरोग्याबरोबरच रोगप्रतिकारशक्ती वाढवण्याची आवश्यकता आहे, असेही ते म्हणाले.
उद्घाटन सत्रानंतर स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या क्रीडा विभागाचे संचालक डॉ. विठ्ठलसिंह परिहार यांनी बीजभाषण केले. त्यानंतर सिनेट सदस्य व माजी क्रीडा संचालक प्रा. डॉ. प्रदीप देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सत्रामध्ये डॉ. माधुरी मार्डीकर, नागपूर यांनी सखोल मार्गदर्शन केले. या सत्राचा अध्यक्षीय समारोप डॉ.प्रदीप देशमुख यांनी केला. तसेच शोधनिबंध वाचन सत्राचे अध्यक्ष डॉ. गोविंद मारतळे जळगाव यांनी अध्यक्षीय समारोप केला तर या सत्रात डॉ. गोपाळ मोघे लातूर, डॉ.गजानन कदम, नांदेड यांनी प्रातिनिधिक स्वरूपात शोधनिबंध वाचन केले.
यावेळी मान्यवरांच्या उपस्थितीत ‘रोल ऑफ फिजिकल एज्युकेशन अँड योगा फॉर मेन्टेनन्स ऑफ हेल्थ अँड फिटनेस अंडर कोविड-१९ ‘ या ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले.
या राष्ट्रीय चर्चासत्राचा समारोप महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. डी.डी.चौधरी यांनी केला. या चर्चासत्रासाठी देशभरातून ऐंशीहून अधिक अभ्यासक व संशोधक सहभागी झाले होते तर पन्नास हून अधिक शोधनिबंध प्राप्त झाले आहेत.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक‌व मान्यवरांचा परिचय इंग्रजी विभागप्रमुख प्रा. अतिश आकडे यांनी केला. सूत्रसंचालन हिंदी विभागातील सहाय्यक प्राध्यापक डॉ. पांडुरंग चिलगर यांनी केले, तर आभार संयोजक व क्रीडा विभाग प्रमुख डॉ. अभिजीत मोरे यांनी मानले.

About The Author