पालकांनो! तुमची स्वप्ने मुलांवर लादू नयेत – तृप्ती अंधारे

पालकांनो! तुमची स्वप्ने मुलांवर लादू नयेत - तृप्ती अंधारे

श्री मारवाडी राजस्थान शिक्षण संस्था अंतर्गत विविध विद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव व शिष्यवृत्ती वितरण समारंभ उत्साहात संपन्न

लातूर (प्रतिनिधी) : आधुनिक स्पर्धेच्या युगात पालकांमध्ये आपल्या मुलांना घडविण्याची जोरदार स्पर्धा सुरू असून इतरांच्या मुलांचे अनुकरण करून आपल्या मुलांचे करिअर घडविण्याचा प्रयत्न केला जातो. आपली स्वप्ने पालक मुलांवर लादतात तेव्हा भविष्यात ही मुलं यशस्वी होत नाहीत. म्हणून पालकांनी त्यांना त्यांचे भविष्य घडवू द्यावे विनाकारण आपली स्वप्ने बळजबरीने त्यांच्यावर लादू नयेत असे आवाहन जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी तृप्ती अंधारे यांनी शुक्रवारी येथे केले.

श्री मारवाडी राजस्थान शिक्षण संस्थेच्या वतीने संस्था अंतर्गत श्री गोदावरीदेवी लाहोटी विद्यालय, श्री मारवाडी राजस्थान विद्यालय, बंकटलाल लाहोटी इंग्लिश स्कूल, राजा नारायणलाल लाहोटी इंग्लिश स्कूल, सौ. केशरबाई भार्गव आदी विद्यालयातील 2020 व 2021 वर्षातील गुणवंत विद्यार्थी गौरव आणि शिष्यवृत्ती वितरण समारंभ शिक्षणाधिकारी तृप्ती अंधारे व शिव छत्रपती शिक्षण संस्थेचे सचिव अनिरुद्ध जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत दयानंद सभागृहात पार पडला. 2020 वर्षातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव व शिष्यवृत्तीचे वाटप दुपारच्या सत्रात झाले. याप्रसंगी बोलताना तृप्ती अंधारे आपल्या भाषणात पुढे बोलताना म्हणाल्या की पालकांचा व शिक्षकांचा एक शब्द मुलांना घडवतो व बिघडवतो देखील म्हणून त्यांच्याशी सर्वांनी प्रेमाने वागले आणि बोलले पाहिजे. त्यांची वाढ व विकास आपल्या हातात असते. मुलं हीच आपली संपत्ती असून भारताचे उज्वल भविष्य आहेत. त्यांचे भविष्य अधिक उज्ज्वल करण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करावा. श्री मारवाडी राजस्थान शिक्षण संस्थेने विद्यार्थ्यांना दैवत मानून त्यांच्या भविष्याला आकार देण्याचे काम केले असल्याचेही तृप्ती अंधारे म्हणाल्या.


भावनिक विचारसरणी वाढली पाहिजे –अनिरुद्ध जाधव

श्री मारवाडी राजस्थान शिक्षण संस्था अंतर्गत विविध विद्यालयातील 2021 वर्षातील गुणवंत विद्यार्थी गौरव व शिष्यवृत्ती वितरण समारंभाच्या सकाळच्या सत्रात प्रमुख अतिथी म्हणून बोलताना शिवछत्रपती शिक्षण संस्थेचे सचिव अनिरुद्ध जाधव म्हणाले की विद्यार्थ्यांमध्ये बौद्धिक कौशल्या बरोबर सर्वांगीण विकास झाला पाहिजे. परीक्षेतील यश आयुष्यभर येईल असे नाही तर इतर गुण सुद्धा आत्मसात केले पाहिजे. विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्त्व संवेदनशील बनले पाहिजे यासाठी त्यांची भावनिक विचारसरणी वाढणे गरजेचे आहे. अशा विचारसरणीचे विद्यार्थी कोणत्याही संकटाला तोंड देऊ शकतात व कोणत्याही विकाराला बळी पडत नाही. पालक, शिक्षक, शाळा व सहकाऱ्या विषयी विद्यार्थ्यांच्या मनामध्ये आदर वाढला पाहिजे. व्यक्तिमत्त्व संवेदनशील असेल तरच त्यांच्यामध्ये दुसऱ्यांबद्दल आदर वाढतो म्हणून विद्यार्थ्यांनी केवळ गुणवत्तेला महत्त्व देऊ नये त्यासोबतच सर्वांगीण विकासालाही महत्व द्यावे. श्री मारवाडी राजस्थान विद्यालयाचे माजी विद्यार्थी असल्याने अनिरुद्ध जाधव यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला व स्वातंत्र्यपूर्व काळातील शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणारी श्री मारवाडी राजस्थान विद्यालय ही कायम मनात आपल्या मनात कोरली असल्याचे गौरव उद्गार त्यांनी काढले. संस्थेच्या वतीने आयोजित गुणवंत विद्यार्थी गौरव व शिष्यवृत्ती वितरण समारंभात संस्था अंतर्गत सर्व शाळांतील जवळपास पावणेदोनशे विद्यार्थ्यांना प्रमुख मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.

या समारंभाला श्री मारवाडी राजस्थान शिक्षण संस्थेचे विश्वस्त अध्यक्ष लक्ष्मीरमण लाहोटी, संस्थेचे अध्यक्ष शैलेश लाहोटी, सचिव ॲड आशिष बाजपाई, सहसचिव शरदकुमार नावंदर, उपाध्यक्ष राजेंद्र मालपाणी, कोषाध्यक्ष ईश्वरप्रसाद डागा, कमलकिशोर अग्रवाल, शांतीलाल कुचेरिया, किशोर भराडिया, आनंद लाहोटी, डॉ. अनिल राठी, रवींद्र व्होरा, संगीता लाहोटी आदींची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे सचिव ॲड आशिष बाजपाई यांनी केले. संस्था अध्यक्ष शैलेश लाहोटी यांनीही यथोचित मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन आनंद कुलकर्णी व योगिता संदीकर यांनी केले तर संस्थेचे सहसचिव शरदकुमार नावंदर यांनी आभार प्रदर्शन केले. कार्यक्रमाला श्री मारवाडी राजस्थान शिक्षणसंस्था अंतर्गत सर्व शाळांतील गुणवंत विद्यार्थी, पालक, शिक्षक, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About The Author