वाहनतळ व्यवस्थापिका फातिमा शेख यांचा उत्कृष्ट कार्याबद्दल सत्कार
लातूर (प्रतिनिधी) : कोव्हिड-19 लॉक डाऊन च्या पार्श्वभूमीनंतर दयानंद शिक्षण संस्थेतील सगळीच महाविद्यालये कोव्हिडच्या सर्व नियमांचे पालन करून सुरू झाली आहेत. संपूर्ण शिक्षण संस्थेचा परिसर दोन वर्षानंतर विद्यार्थी-विद्यार्थिनींनी फुलून गेला आहे. विद्यार्थी-विद्यार्थिनींची संख्या वाढली तसे तसे संस्था परिसरात वाहनांची वर्दळही वाढली. वाढत्या वाहनांची वर्दळ लक्षात घेऊन दयानंद शिक्षण संस्था अध्यक्ष लक्ष्मीरमणजी लाहोटी आणि सचिव रमेशजी बियाणी यांनी वाहनांची पार्किंग व्यवस्थित करण्यासंदर्भात मौलिक सूचना दिल्या होत्या. चार चाकी वाहने संस्था परिसरातील मुख्य रस्त्याच्या दुतर्फा लावली जात असत. त्यामुळे विद्यार्थ्यांना महाविद्यालय परिसरात येण्या-जाण्याचा अडथळा निर्माण होत होता. तो टाळण्यासाठी दयानंद विधी महाविद्यालयातील महाविद्यालयाच्या समोरील प्रांगणात दयानंद शिक्षण संस्थेच्या परिसरातील प्राध्यापक व प्रशासकीय कर्मचारी यांच्या चारचाकी वाहनांची व्यवस्था करण्यात आली. महाविद्यालयात प्रवेशित सर्व मुलींच्या दुचाकी वाहनांची व्यवस्था विधी महाविद्यालयासमोर करण्यात आली. प्रस्तुत प्रांगणात वाहन व्यवस्थापिका म्हणून फातिमा शेख या काम पाहतात. ही वाहने अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने त्या लावून घेतात. दयानंद कला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवाजी गायकवाड सकाळी मॉर्निंग वॉकला आल्यानंतर रोज ही व्यवस्था पाहत असतात. त्यांच्या शिस्तबद्ध कार्याबद्दल अभिप्रायही मिळाले. फातिमा शेख यांच्या कार्याची दखल घेऊन आज ‘नो व्हेईकल डे’च्या निमित्ताने राष्ट्रगीतासाठी एकत्र जमलेल्या विद्यार्थ्यांसमोर रुपये पाचशे आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. दयानंद कला महाविद्यालयात गेल्या अनेक वर्षापासून ‘नो व्हेइकल डे’ पाळला जातो. आजही ही परंपरा सुरु आहे. याचाच एक भाग म्हणून दयानंद कला महाविद्यालयातील कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक डॉ. देवेंद्र कुलकर्णी हे आज सायकल वर आले होते. त्यांच्या या अभिनव प्रयोगाबद्दल त्यांचाही सत्कार करण्यात आला. प्रस्तुत उपक्रमाचे दयानंद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मीरमणजी लाहोटी आणि सचिव रमेशजी बियाणी कौतुक करून कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले.