देशाच्या एकता व अखंडतेसाठी केंद्र- राज्य संबंध सौहार्दपूर्ण असणे गरजेचे – डॉ. जी. आर. कारीकंटे
भारतीय राजकारण आणि केंद्र-राज्य संबंधातील तणाव ‘ या ग्रंथाचे मान्यवरांच्या उपस्थितीत प्रकाशन संपन्न
अहमदपूर (गोविंद काळे) : भारताची बहुभाषिक आणि बहुसांस्कृतिक परंपरा लक्षात घेऊनच घटनाकारांनी केंद्र आणि राज्य अशी सत्तेची दोन केंद्रे निर्माण केली असून, राष्ट्रीय एकता व अखंडता टिकविण्यासाठी केंद्र आणि राज्याचे संबंध हे नेहमीच सौहार्दपूर्ण असावेत, असे प्रतिपादन वै. धुंडामहाराज महाविद्यालय देगलूर येथील राज्यशास्त्राचे अभ्यासक डॉ. जी. आर. कारीकंटे यांनी केले.
याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, येथील महात्मा फुले महाविद्यालयाच्या राज्यशास्त्र विभाग व स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने दि. २० डिसेंबर २०२१ रोजी आयोजित करण्यात आलेल्या ‘भारतीय राजकारण आणि केंद्र-राज्य संबंधातील तणाव’ या विषयावरील या एक दिवसीय राष्ट्रीय ऑनलाइन परिषदेच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील हे होते, तर प्रमुख उपस्थिती म्हणून किसान शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव ज्ञानदेव झोडगे साहेब हे उपस्थित होते. यावेळी पुढे बोलताना डॉ.कारीकंटे म्हणाले की, केंद्रातील सरकारने मिळालेल्या बहुमताचा गैरवापर करून राज्यातील इतर पक्षांच्या सरकारांची मुस्कटदाबी करणे म्हणजे देशाची वाटचाल हुकूमशाहीकडे होणे असा आहे. केंद्राने राज्यांना आर्थिक स्वातंत्र्याबरोबरच स्वायत्तता ही बहाल केली पाहिजे. मात्र त्याच वेळेस राज्यांनी ही केंद्रावर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करु नये, असेही ते यावेळी म्हणाले.
या परिषदेचे प्रमुख वक्ते व बीज भाषक स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या राज्यशास्त्र अभ्यास मंडळाचे सदस्य डॉ डी.एम. कुंचलवाड हे होते. बीजभाषणाप्रसंगी डॉ. कुंचलवाड म्हणाले की, भारत हे संघराज्य नसून, राज्यांचा संघ आहे. केंद्र सरकारने पक्षीय अभिनिवेश बाजूला ठेवून राज्यांना समान अधिकार दिले पाहिजेत, असेही ते यावेळी म्हणाले. यानंतर झालेल्या शोधनिबंध वाचन सत्राच्या अध्यक्षस्थानी डॉ.नवनाथ अडकिने ( उमरी) हे होते. तर डॉ.आर. डी. शिंदे (सोनखेड ) , डॉ.विलास कराळे (आखाडा बाळापूर ) आणि प्रा. प्रज्ञा कांबळे (लातूर) यांनी या सत्रात शोध निबंधांचे वाचन केले.
या राष्ट्रीय ऑनलाईन परिषदेचा अध्यक्षीय समारोप राजकीय तिरंदाजी या ग्रंथाचे लेखक तथा ज्येष्ठ राजकीय विश्लेषक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांनी केला.
यावेळी मान्यवरांच्या उपस्थितीत ‘भारतीय राजकारण आणि केंद्र-राज्य संबंधातील तणाव ‘ या ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संयोजक डॉ. प्रकाश चौकटे यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. मारोती कसाब यांनी केले, तर आभारप्रदर्शन ह.भ.प. प्रो.डॉ. अनिल महाराज मुंढे यांनी केले. राष्ट्रगीताने या कार्यक्रमाची सांगता झाली. या परिषदेस ७० हून अधिक संशोधक, अभ्यासक, प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते.