दयानंद कलाच्या विद्यार्थ्यांनी घेतले नळदुर्ग किल्ल्याचे दर्शन
लातूर (प्रतिनिधी) : आजादी का अमृत महोत्सवाचे औचित्य साधून दयानंद कला महाविद्यालयातील संगीत विभागाच्या वतीने ऐतिहासिक किल्ला नळदुर्ग येथे कोविड-१९ च्या सर्व नियमांचे पालन करून सहलीचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांना ऐतिहासिक स्थळाची भेट घेऊन तेथील स्थापत्यशास्त्र व वास्तुकला याचा जवळून परिचय व्हावा, किल्ल्याची भव्यता व दिव्यता त्यांच्या लक्षात यावी, याच बरोबर त्या काळात अशा किल्ल्यांवर झालेल्या पराक्रमांचा परिचय करून द्यावा, निसर्गाशी संवाद साधवा या उदात्त हेतूने या सहलीचे आयोजन करण्यात आले होते.
दयानंद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मीरमण लाहोटी, सरचिटणीस रमेश बियाणी, संयुक्त सचिव सुरेश जैन यांच्या मार्गदर्शनाखाली या सहलीचे आयोजन करण्यात आले होते. प्रारंभी दयानंद कला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवाजी गायकवाड यांनी सहलीसाठी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी उपप्राचार्य अनिलकुमार माळी, पर्यवेक्षक डॉ.दिलीप नागरगोजे, संगीत विभाग प्रमुख डॉ.देवेंद्र कुलकर्णी, डॉ सुनीता सांगोले, डॉ.रामेश्वर खंदारे, प्रा शरद पाडे, प्रा.सोमनाथ पवार आदी उपस्थित होते. डॉ.संदीप जगदाळे यांनी सहलीचे संयोजक म्हणून भूमिका पार पाडली. डॉ.गोपाल बाहेती, डॉ.शैलजा दामरे, प्रा महेश जंगापल्ले यांच्यासह १६ विदयार्थी ३९ विद्यार्थ्यांनी सहभागी झाल्या होत्या.
विद्यार्थ्यांनी नळदुर्ग किल्ल्यात ३ किलोमीटर पसरलेली तटबंदी, संरक्षण व्यवस्था, रणमंडल, खंदक, पाणी महाल, टेहळणीचा उपल्या बुरूज, त्यावरील लांब तोफ,शिवाय ११४ बुरुज,धबधबा, दरवाजाचा वक्राकार मार्ग याची पाहणी करून विद्यार्थ्यांनी शौर्य पराक्रम व भव्यदिव्यता याची अनुभूती घेतली. नळदुर्गाचा इतिहास नळराजा व दमयंती राणी यांच्याशी संबंधित आहे. हा किल्ला कल्याणीच्या चालुक्य राजाच्या ताब्यात होता. पुढे तो बहामनी सुलतानांच्या ताब्यामध्ये आला. बहामनी राज्याची शकले उडाली व त्यातून ज्या शाह्या निर्माण झाल्या त्यामधील विजापूरच्या आदिलशहीने नळदुर्गावर कब्जा मिळवला. पुढे औरंगजेब या मोगल बादशहाने नळदुर्ग जिंकला आणि त्याची जबाबदारी हैदराबादच्या निजामाकडे सोपवली. या इतिहासाच्या पाऊलखुणा विद्यार्थ्यांनी जाणून घेतल्या.