स्वातंत्र्याची पहिली पहाट राजमाता जिजाऊ – डॉ. गणेश बेळंबे
लातूर (प्रतिनिधी) : दयानंद कला महाविद्यालयातील मराठी विभागाच्यावतीने स्वामी विवेकानंद आणि राजमाता जिजामाता यांच्या जयंती निमित्त व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष दयानंद कला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवाजी गायकवाड, मराठी विभाग प्रमुख डॉ. शिवाजी जवळगेकर यांनी पाहुण्यासमवेत स्वामी विवेकानंद आणि राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला. कार्यक्रमाचे प्रमुख व्याख्याते डॉ. गणेश बेळंबे यांनी राजमाता जिजाऊ यांच्या संस्कारात घडलेल्या छत्रपती शिवरायांनी स्वराज्य निर्माण केले. राजकारण, रयतेची काळजी वाहताना छत्रपती शिवराय, छत्रपती संभाजी यांनी नेहमीच राजमाता जिजाऊ यांच्या उत्तम संस्काराचे दर्शन घडवले असे मत प्रदर्शित करताना त्यांनी उदाहरणे दिली. सुभेदाराची सुन जेव्हा सामोरे आली तेव्हा तिची शत्रुपक्षातील म्हणून हेटाळणी न करता उलट तिची चोळी, बागंडी, ओटी भरुण बहीणीप्रमाणे पाठवणी केली. मोहीमेवर गेलेले बहिर्जी नाईक असतील किंवा अन्य मावळे त्यांच्या कुटूंबाची सर्वोतोपरी काळजी घेण्यात राजमाता जिजाऊ कोठेही कमी पडल्या नाहीत. राजमाता जिजाऊ यांचे रयती प्रती प्रेम, विचक्षण बुद्धीमत्ता, साहसी स्वभाव अशा गुणांची आज गरज आहे. छत्रपती शिवराय घडवायचे असतील तर माता जिजाऊ झाली पाहिजे. आजच्या स्त्रीसमोर आव्हाने असली तरी त्या जिजाऊंचा वसा चालवतील असा अशावाद त्यांनी व्यक्त केला. डॉ. गणेश बेळंबे यांनी आपल्या ओजस्वी, ओघवत्या शैलीत दिलेले व्याख्यान प्रेरणादायी ठरले. प्राचार्य डॉ. शिवाजी गायकवाड यांनी विश्वबंधुत्वाची भावना रुजवणारे स्वामी विवेकानंद यांच्या विचारांची कालातितता स्पष्ट केली. राजमाता जिजामाता यांच्या जयंती निमित्त साहसी, कल्पक, बुध्दीमान मातेच्या संस्कारातून स्वराज्य साकार करणारे छत्रपती शिवराय घडले. असे सांगुन या महान व्यक्तींचा प्रेरणादायी विचार आपल्याला मार्गदर्शक ठरेल. असे विचार व्यक्त केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ. अंकुशकुमार चव्हाण यांनी केले तर आभार डॉ. सुनिता सांगोले यांनी मानले. महाविद्यालयातील प्राध्यापक प्रशासकीय कर्मचारी यांच्या उपस्थितीत कोवीड नियमांचे पालन करुन कार्यक्रम संपन्न झाला.