लातूर (एल पी उगीले) डायल 112 नंबर वर फोन करून अडीअडचणीच्या काळात पोलीस प्रशासनाची मदत मिळवण्यासाठी लातूर जिल्ह्यात तातडीने यंत्रणा कार्यरत झालेली आहे. उदगीर ग्रामीण पोलिसांनी तर आपल्या कर्तबगरीचा आलेख दाखवत एका महिलेचे प्राण वाचवले होते. अशा पद्धतीने पोलीस अत्यंत प्रामाणिकपणे आणि गतिशील त्याने कार्य करत असतानाच काही टुकार प्रवृत्तीचे लोक डायल 112 वर खोटी माहिती देऊन पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र अशा लोकांना पोलीस प्रशासन धडा शिकवू लागली आहे. नुकतेच खोटी माहिती देणाऱ्या इसमाविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 212, 217 अन्वये कारवाई करण्यात आली आहे.
आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना तातडीने पोलीस मदत मिळावी, यासाठी डायल 112 ही महत्त्वपूर्ण आपत्कालीन सेवा कार्यरत आहे. मात्र, या सेवेला खोटी व दिशाभूल करणारी माहिती देऊन पोलीस यंत्रणेचा विनाकारण वापर करणाऱ्या एका व्यक्तीविरुद्ध लातूर ग्रामीण पोलिसांनी कायदेशीर कारवाई केली आहे.पोलीस स्टेशन लातूर ग्रामीण हद्दीतील गंगापूर, ता. जि. लातूर येथील संतोष रामदास पांचाळ याने दि. 3 सप्टेंबर 2026 रोजी डायल 112 या आपत्कालीन सेवेस कॉल करून खोटी माहिती दिल्याचे चौकशीअंती निष्पन्न झाले.
याबाबत अधिक माहिती अशी की, दि. 3 सप्टेंबर 2026 रोजी दुपारी 3.00 डायल 112 वर कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार पाटील, यांना डायल 112 च्या प्रणालीवर संतोष रामदास पांचाळ याने आपल्या मोबाईलवरून संपर्क साधला. संबंधित व्यक्तीने आपला भाऊ गणेश हा त्यांची आई, पत्नी व भावजयी यांना जिवे मारत असल्याची माहिती पोलीस यंत्रणेला दिली. त्यावरून पोलीस तात्काळ सदर ठिकाणी पोहोचून कॉलची व मिळालेल्या माहितीची चौकशी करण्यात आली असता सदर माहिती खोटी असल्याचे तसेच प्रत्यक्षात कोणताही भांडणतंटा अथवा संबंधित स्वरूपाची घटना घडलेली नसल्याचे निष्पन्न झाले.
संतोष पांचाळ याने कोणताही कायदेशीर अथवा वस्तुनिष्ठ आधार नसताना जाणीवपूर्वक खोटी माहिती देऊन पोलीस यंत्रणेचा वेळ, मनुष्यबळ व शासकीय साधनसामग्रीचा विनाकारण वापर होईल, असे कृत्य केल्याचे निष्पन्न झाल्याने त्याच्याविरुद्ध पोलीस स्टेशन लातूर ग्रामीण येथे भारतीय न्याय संहिता कलम 212 व 217 अन्वये कायदेशीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर प्रकरणाचा तपास व पुढील कायदेशीर कार्यवाही पोलीस प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
या कारवाईत सहाय्यक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी मेघना आय. एन. यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुधीर सूर्यवंशी, पोलीस उपनिरीक्षक गोपाळ वराडे, सहायक फौजदार विलास फुलारी, पोलीस अंमलदार वाजिद चिकले, राजेंद्र शिंदे,बालाजी चव्हाण गुडमेवाड यांनी केली आहे.
नागरिकांना लातूर ग्रामीण पोलिसांचे आवाहन.
डायल 112 ही सेवा नागरिकांना पोलीस, अग्निशमन व इतर आपत्कालीन परिस्थितीत तातडीने मदत मिळावी यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही प्रकारचे खोटे, फेक अथवा दिशाभूल करणारे कॉल करू नयेत.खोट्या कॉलमुळे पोलीस यंत्रणेचा मौल्यवान वेळ व मनुष्यबळ विनाकारण खर्च होते. तसेच प्रत्यक्षात संकटात असलेल्या व तातडीच्या मदतीची आवश्यकता असलेल्या नागरिकांपर्यंत पोलीस मदत पोहोचण्यास विलंब होण्याची शक्यता निर्माण होते.त्यामुळे सर्व नागरिकांनी डायल 112 या आपत्कालीन सेवेचा जबाबदारीने व केवळ वास्तविक आपत्कालीन परिस्थितीतच वापर करावा.













Responses (0 )