उदगीर (एल पी उगीले) उदगीर व जळकोट तालुक्यांतील दुष्काळी परिस्थितीमुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना शासनाने तात्काळ भरीव आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी माजी मंत्री आमदार संजय बनसोडे यांनी लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्याकडे केली.
उदगीर तालुक्यातील शेकापूर तसेच जळकोट तालुक्यातील बेळसांगवी येथे शेतीच्या बांधावर जाऊन दुष्काळग्रस्त भागाची पाहणी करण्यात आली. या पाहणीदरम्यान शेतीची सद्यस्थिती, पावसाचा खंड आणि पिकांवर झालेल्या संभाव्य परिणामांची माहिती घेण्यात आली. पावसाच्या अनियमिततेमुळे खरीप हंगामातील पिकांचे नुकसान होऊन शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. त्यामुळे परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळणे आवश्यक असल्याचे आ.संजय बनसोडे यांनी सांगितले .
शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी बाधित क्षेत्राची वस्तुनिष्ठ पाहणी करून नुकसानीचे पंचनामे करावेत.
शेती हा ग्रामीण अर्थव्यवस्थेचा मुख्य आधार असल्याने शेतकऱ्यांना संकटाच्या काळात मदतीचा हात देणे गरजेचे आहे. शासनाने परिस्थितीची तातडीने दखल घेऊन शेतकऱ्यांच्या हितासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
उदगीर व जळकोट तालुक्यांतील शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढण्यासाठी प्रशासनाने तातडीने कार्यवाही करावी आणि शेतकऱ्यांना भरीव मदत मिळवून द्यावी, यासाठी पाठपुरावा करण्यात येणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.
यावेळी पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केंद्र व राज्य शासनाच्या वतीने शेतकरी बांधवांना मदत करणार असल्याचे सांगून जनावरांसाठी चारा, पाणी व चारा छावण्या सुरु करणार असल्याचे सांगितले .
यावेळी सभापती , उपसभापती , जिल्हा परिषद सदस्य , यांच्या सह महायुतीचे आजी - माजी पदाधिकारी , सर्व विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते .








Responses (0 )