रेणापूर (एल पी उगीले)
शेतातील सामायिक बांधावरील गवत जाळताना शेजारील शेतातील ऊस व सिंचन साहित्य जळून नुकसान झाल्याच्या प्रकरणात रेणापूर येथील प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी न्यायालयाने आरोपी बालासाहेब विठ्ठल शिंदे यास भारतीय दंड विधानाच्या कलम ४३५ अन्वये १५ दिवसांचा साधा कारावास व ५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. दंडाची रक्कम न भरल्यास अतिरिक्त १५ दिवसांचा साधा कारावास भोगण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत.
या प्रकरणातील फिर्यादी जिजाबाई संभाजी भिसे (रा. घनसरगाव, ता. रेणापूर) यांच्या शेतात ६ मार्च २०१९ रोजी सकाळी त्या काम करीत असताना, शेजारील शेतकरी बालासाहेब विठ्ठल शिंदे हा सामायिक बांधावरील गवत जाळण्यासाठी आला. यावेळी फिर्यादी व शेतातील अन्य व्यक्तीने उसाचे पीक जवळ असल्याने गवत जाळू नये, अन्यथा पिकाचे नुकसान होऊ शकते, असे त्यास सांगितले. मात्र, त्याने गवत पेटविल्याने आग शेजारील उसाच्या पिकाला लागली. या आगीत सुमारे १५ गुंठे ऊस तसेच जैन कंपनीचे अडीच इंची सहा पाइप व सुमारे १०० मीटर केबल जळून अंदाजे २५ हजार रुपयांचे नुकसान झाले.
याप्रकरणी रेणापूर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ९८/२०१९ अन्वये भारतीय दंड विधानाच्या कलम ४३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस अमलदार एस. एस. सूर्यवंशी यांनी तपास केला. प्रकरणाची सुनावणी प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी, न्यायालय क्रमांक २, रेणापूर येथे न्यायाधीश डी. एम. गित्ते यांच्या न्यायालयात झाली. न्यायालयाने आरोपीस वरीलप्रमाणे शिक्षा सुनावली असून, दंडाची ५ हजार रुपये रक्कम साक्षीदार क्रमांक ३ अर्चना यांना देण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणात सरकारी पक्षातर्फे ॲड. विशाल मुरळीकर यांनी काम पाहिले. न्यायालयीन कामकाजासाठी पोलीस अंमलदार पी. सी. कांदे यांनी काम पाहिले.








Responses (0 )