उदगीर (एल पी उगीले) शिव शिंपी समाज, उदगीर यांच्या वतीने श्रावण महिन्याचे औचित्य साधून पारंपारिक श्रावण भोज व गुणवंत विद्यार्थी गुणगौरव सोहळ्याचे आयोजन मोठ्या उत्साहात करण्यात आले होते. समाजातील गुणवंतांचा सन्मान करून त्यांच्या यशाला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने आयोजित केलेल्या या कार्यक्रमाला समाजबांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
या सोहळ्यात समाजातील दोन हुशार विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केल्याबद्दल त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. यामध्ये कु. सृष्टी सिद्धेश्वर ममदापूरे हिने इयत्ता १० वीच्या सीबीएससी बोर्ड परीक्षेत ८८ टक्के गुण मिळवून उल्लेखनीय यश संपादन केले आहे. तिच्या या यशामुळे संपूर्ण उदगीर शहरात तिचे कौतुक होत आहे.
तसेच कुमार अभिनव अरविंद ममदापूरे याने इयत्ता १० वीच्या राज्य मंडळाच्या परीक्षेत ९४.८० टक्के गुण मिळवून दैदीप्यमान यश प्राप्त केले आहे. दोघांनीही आपल्या यशाने ममदापूरे कुटुंबीयांसह संपूर्ण शिव शिंपी समाजाची मान उंचावली आहे.
या दोन्ही गुणवंत विद्यार्थ्यांचा समाजाच्या वतीने शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन जाहीर सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांनी मिळवलेले हे यश, हे त्यांच्या कठोर मेहनत, सातत्य, चिकाटी आणि पालकांच्या योग्य मार्गदर्शनाचे फलित असल्याचे गौरवोद्गार यावेळी मान्यवरांनी व्यक्त केले.
गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव म्हणजे समाजाच्या उज्ज्वल भविष्याचा सन्मान आहे. अशा कार्यक्रमांमुळे समाजातील इतर विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या क्षेत्रात उत्तुंग भरारी घेण्यासाठी निश्चितच प्रेरणा मिळते, असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.
हा संपूर्ण कार्यक्रम शिव शिंपी समाजाचे अध्यक्ष रतिकांत शिवकुमार आंबेसंगे, सचिव मुकेश धर्मराज नेरूणे यांच्या मार्गदर्शनाखाली व सर्व कार्यकारी मंडळ, महिला मंडळ आणि युवा मंडळाच्या अथक परिश्रमातून यशस्वीरित्या पार पडला. यावेळी समाजातील ज्येष्ठ नागरिक, महिला व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.














Responses (0 )