Police Flash News

शस्त्र हाताळणी व फायरिंग प्रशिक्षणात लातूर जिल्हा महाराष्ट्रात प्रथम

0
15
शस्त्र हाताळणी व फायरिंग प्रशिक्षणात लातूर जिल्हा महाराष्ट्रात प्रथम

लातूर (एल पी उगीले)

महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक सादानंद दाते यांच्या संकल्पनेतून संपूर्ण महाराष्ट्रात पोलीस अधिकारी व अंमलदारांना शस्त्र हाताळणी, सुरक्षितता आणि फायरिंगबाबत प्रशिक्षण देण्याचा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली लातूर जिल्हा पोलीस दलाने निर्धारित वेळेपूर्वी प्रशिक्षण पूर्ण करून महाराष्ट्रात सर्वप्रथम प्रशिक्षण पूर्ण करण्याचा मान मिळविला आहे.

या प्रशिक्षण उपक्रमासाठी पोलीस उपनिरीक्षक एम. बी. आंधळे आणि त्यांच्यासोबत नऊ डीआय यांनी पुणे येथे जाऊन शस्त्र प्रशिक्षणासंदर्भातील एक आठवड्याचे प्रशिक्षण पूर्ण केले. त्यानंतर लातूर जिल्ह्यातील एकूण १,८१० पोलीस अंमलदार आणि १२० पोलीस अधिकारी अशा एकूण १,९३० अधिकारी-अंमलदारांसाठी तीन दिवसांची प्रशिक्षण सत्रे आयोजित करण्यात आली. या सत्रांमध्ये फायरिंग, शस्त्रांचा योग्य वापर, सुरक्षित हाताळणी आणि शस्त्रांविषयी आवश्यक तांत्रिक बाबींचे सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. त्यामुळे अधिकारी व अंमलदारांचे शस्त्र हाताळणीसंबंधी ज्ञान अधिक दृढ होण्यास मदत झाली.

जिल्ह्यातील प्रशिक्षण सत्रांसाठी चाकूर येथील बटचा वापर करण्यात आला. मात्र, तेथे बट उपलब्ध नसल्याने पुढील प्रशिक्षण सत्रे धाराशिव येथे आयोजित करण्यात आली. ऊन-पाऊस आणि इतर अडचणींची पर्वा न करता संबंधित प्रशिक्षण पथकाने नियोजनबद्ध पद्धतीने काम करत सलग ४६ प्रशिक्षण सत्रे निर्धारित वेळेपूर्वी पूर्ण केली.

या प्रशिक्षण मोहिमेत ९६.४२ टक्के प्रशिक्षण पूर्णत्वाची टक्केवारी नोंदविण्यात आली. महाराष्ट्रात सर्वप्रथम प्रशिक्षण पूर्ण करण्याची कामगिरी लातूर जिल्हा पोलीस दलाने केली. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल पोलीस महासंचालक सादानंद दाते यांनी लातूरचे पोलीस अधीक्षक अमोल तांबे आणि संपूर्ण प्रशिक्षण पथकाचे अभिनंदन केले.

पोलीस अधिकारी व अंमलदारांना शस्त्रांचा प्रभावी वापर करता येण्याबरोबरच शस्त्र हाताळताना आवश्यक सुरक्षिततेचे नियम पाळता यावेत, त्यांचे कौशल्य वाढावे आणि आपत्कालीन परिस्थितीत ते अधिक सक्षमपणे कर्तव्य बजावू शकावेत, हा या प्रशिक्षण उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे. लातूर जिल्हा पोलीस दलाने नियोजन, समन्वय आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांच्या माध्यमातून ही कामगिरी साध्य केली आहे.

S
WRITTEN BY

Superadmin

Responses (0 )

    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌

Related posts