Police Flash News

दिवाळीत ग्राहकांची फसवणूक रोखण्यासाठी लातूर जिल्ह्यात भरारी पथके स्थापन करा – जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

0
3
दिवाळीत ग्राहकांची फसवणूक रोखण्यासाठी लातूर जिल्ह्यात भरारी पथके स्थापन करा – जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

लातूर (दयानंद स्वामी) दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठांमध्ये ग्राहकांची संभाव्य फसवणूक रोखण्यासाठी लातूर जिल्ह्यात अन्न व औषध प्रशासन आणि वैधमापनशास्त्र विभागामार्फत विशेष भरारी पथके स्थापन करून संयुक्त तपासणी मोहीम राबविण्यात यावी, अशी मागणी जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेचे सदस्य तथा अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे लातूर जिल्हाध्यक्ष दत्तात्रय गुरुनाथ मिरकले-पाटील आणि परिषदेचे सदस्य विवेकानंद वसंत वाडीकर यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

दिवाळीच्या काळात बाजारपेठांमध्ये मिठाई, खाद्यपदार्थ, कपडे, इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि विविध घरगुती वस्तूंच्या खरेदी-विक्रीत मोठी वाढ होते.

ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अनेक व्यापाऱ्यांकडून लकी ड्रॉ, गिफ्ट कूपन, आकर्षक बक्षिसे आणि विविध सवलत योजनांचा प्रचार केला जातो. मात्र, काही योजनांमध्ये अटी व शर्ती स्पष्ट न करणे, दिशाभूल करणाऱ्या जाहिराती करणे, बक्षिसांचे आमिष दाखवून खरेदीस प्रवृत्त करणे तसेच बक्षीस वितरणात पारदर्शकता न ठेवणे, अशा प्रकारांतून ग्राहकांची आर्थिक फसवणूक होण्याची शक्यता आहे.

याशिवाय, मिठाई व खाद्यपदार्थांची गुणवत्ता, अन्नपदार्थांचे वजन, पॅकबंद वस्तूंवरील घोषित किंमत, निव्वळ वजन, उत्पादन व कालबाह्यता दिनांक तसेच वजन-मापांमध्ये होणाऱ्या संभाव्य गैरप्रकारांवरही प्रशासनाने लक्ष ठेवणे आवश्यक असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

या पार्श्वभूमीवर लातूर जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण बाजारपेठा, दुकाने, शॉपिंग सेंटर आणि व्यावसायिक आस्थापनांची नियमित तपासणी करावी. ग्राहकांची दिशाभूल करणाऱ्या जाहिराती, नियमबाह्य योजना, वजन-मापांतील अनियमितता आणि खाद्यपदार्थांबाबतच्या नियमांचे उल्लंघन आढळल्यास संबंधितांवर लागू कायद्यानुसार कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

तसेच ग्राहकांच्या तक्रारींसाठी स्वतंत्र संपर्क व्यवस्था उपलब्ध करून देणे, तक्रारींची तातडीने दखल घेणे आणि केलेल्या तपासणी व कारवाईचा अहवाल निवेदनकर्त्यांना लेखी स्वरूपात देणे, अशीही मागणी करण्यात आली आहे.

दिवाळीच्या खरेदीत ग्राहकांची लूट होऊ नये, त्यांना सुरक्षित व दर्जेदार वस्तू योग्य दरात मिळाव्यात आणि बाजारपेठेतील व्यवहार पारदर्शक राहावेत, यासाठी प्रशासनाने सणासुदीच्या काळात विशेष दक्षता घ्यावी, असे आवाहन दत्तात्रय मिरकले-पाटील व विवेकानंद वाडीकर यांनी केले आहे.

S
WRITTEN BY

Superadmin

Responses (0 )

    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌

Related posts