यवतमाळ जिल्ह्यात गॅस कटर टोळीचा धुमाकूळ; दोन ठिकाणी एटीएम फोडून लाखोची रोकड लंपास
यवतमाळ (प्रतिनिधी) : चोरट्यांच्या टोळीकडून जिल्ह्यातील एटीएम टार्गेट करून गॅस कट्टरच्या सहाय्याने एटीएम फोडून लाखोची रोकड लंपास केल्याची घटना आर्णी शहरात तसेच महागाव तालुक्यातील हिवरा संगम येथे घडली. या दोन्ही ठिकाणी एटीएम फोडताना गॅस कट्टरचा वापर करण्यात आला आहे.
राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या महागाव तालुक्यातील हिवरा संगम येथिल मुख्य रस्त्यावर हिताची कंपनीची एजन्सी असीम अकबानी कमिशन बेस वर चालवत असून गुरुवार दि १० मार्च रोजी सकाळी २.०२ च्या सुमारास हिताची कंपनीचे एटीएम अज्ञात चोरट्यानी गॅस कट्टरच्या सहाय्याने फोडले आहे.या एटीएम मशीन मधून १५हजार आठशे रुपयाची रोकड लंपास केल्यानंतर अज्ञात चोरट्यानी एटीएम फोडून शटर लावून सुद्धा घेतले होते तर सदर घटनेची माहिती नेहमी प्रमाणे मोसीम एजन्सीचे मालक असीम अकबानी नेहमी प्रमाणे शटर उघडण्यास गेले असता त्यांना एटिएमचे शटर गॅस कट्टरच्या साहाय्याने तोडलेले आढळून आल्याने त्यांनी शटर उघडून बघितले असता एटीएम मशीन उघडलेल्या अवस्थेत आढळून आली याची माहिती महागाव पोलिस स्टेशनला दिली असता महागावचे ठाणेदार विलास चव्हाण, उपनिरीक्षक राहुल वानखेडे,बिट जमादार संतोष जाधव, विनोद जाधव, रुपेश चव्हाण,नारायण पवार, गोपनीय शाखेचे अर्जुन राठोड, चालक विवेक पारडकर यांनी घटनास्थळी दाखल होत तपासाला सुरुवात केली असून पुढील तपास महागाव पोलीस करत आहेत.
तर एटीएम फोडीची दुसरी घटना आर्णी शहरातील मुख्य मार्गावरील शिवनेरी चौकात असलेल्या बँक ऑफ इंडियाचे एटीएम फोडण्यासाठी येथेही गॅस कट्टरचा वापर केलाआहे. या एटीएम मधून अज्ञात चोरट्यानी चक्क २०लाख ४३हजार पाचशे रुपये रोकड लंपास केल्याची घटना गुरुवार दि.१० मार्चला सकाळी ३.००च्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी कंपनीचे मँनेजर मनोज वसंतराव जाधव यांनी आर्णी पोलीस स्टेशनला फिर्याद दिली.घटनेची माहिती मिळताच प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल आडे भेट दिली तर आर्णी पोलीस स्टेशनचे ठाणेदार पितांबर जाधव हे आपल्या पथकासह घटनास्थळी दाखल होऊन पुढील तपास करीत आहेत. ठसे तद्य सुद्धा दोन्ही ठिकाणी पाचारण झाले होते.या दोन्ही ठिकाणी एटीएम फोडीच्या घटनेने एटीएम सुरक्षितितेचा प्रश्न ऐरणीवर आला असून सदर दोन्ही धाडसी चोरीमुळे नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
चौकट
सीसीटीव्ही वर मारला स्प्रे : महागाव तालुक्यातील हिवरा संगम येथे चोरी करण्याच्या उद्देशाने आलेल्या चोरट्यानी एटिएमच्या आजूबाजूला असलेल्या दुकानाबाहेरील सीसीटीव्हीवर काळा कलरचा स्प्रे मारल्याने पुढील चित्रीकरण होऊ शकले नाही.
चौकट
श्वान पथक जाग्यावर घुटमळले : एटीएम चोरीच्या घटनेचा छडा लावण्यासाठी यवतमाळ येथील श्वान पथकाला पाचारण करण्यात आले होते. यावेळी श्वान पथकाला कोणताही सुगावा लागला नसून ते केवळ जागेवरच घुटमळले व आल्या पावली परत गेले.
चौकट
पोलीस अधीक्षक,अप्पर पोलीस अधीक्षक व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची दोन्ही ठिकाणी भेट : पोलीस अधीक्षक डॉ दिलीप भुजबळ पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ खंडेराव धरणे तसेच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दोन्ही ठिकाणच्या घटनेचे गांभीर्य लक्षात घेत एटीएम फोडलेल्या घटनास्थळी तात्काळ दाखल होऊन पाहणी केली. तसेच बँकेचे व्यवस्थापक आणि पैसे भरणाऱ्या कंपनीच्या मॅनेजर कडून अधिक माहिती पोलीस अधीक्षक डॉ.दिलीप भुजबळ पाटील यांनी घेतली.