लातूरमध्ये शिवसेनेची (उद्धव बाळासाहेब ठाकरे) महानगरपालिका निवडणुकीची तयारी सुरू
अहमदपूर ( गोविंद काळे ) – आगामी लातूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने जोरदार तयारी सुरू केली आहे. पक्षाचे लातूर जिल्हा संपर्कप्रमुख, माजी आमदार रोहिदास चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली, लातूर शहरातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची एक महत्त्वाची बैठक नांदेड जिल्ह्यातील लोहा येथे नुकतीच पार पडली.
या बैठकीला जिल्हाप्रमुख बालाजी रेड्डी आणि सहसंपर्कप्रमुख नामदेव चाळक यांची विशेष उपस्थिती होती. आगामी महानगरपालिका निवडणुकीसाठी सर्वांनी सज्ज राहावे, असे आवाहन रोहिदास चव्हाण यांनी यावेळी केले.
चव्हाण यांनी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, शिवसेनेचे विचार आणि पक्षाने केलेली कामे लोकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत.
या बैठकीमुळे लातूर शहरातील शिवसैनिकांमध्ये उत्साह संचारला असून, महानगरपालिका निवडणुकीसाठी रणशिंग फुंकले गेल्याचे दिसून येत आहे.
