परभणी आकाशवाणीवरुन भारतीय कला संस्कृतीची ओळख ही मालिका आजपासून सुरु
अमृत महोत्सवी वर्षानिमित्त महादेव खळुरे यांचे नाविन्यपूर्ण उपक्रम
अहमदपूर (गोविंद काळे) : भारतीय स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्षानिमित्त आजादी का अमृत महोत्सव हा उपक्रम देशातील सर्व राज्यात व केंद्रशासित प्रदेशात दिनांक १२ मार्च २०२१ पासून पुढील ७५ आठवडे राबविण्यात येत आहे.अमृत महोत्सवी वर्षानिमित्त परभणी आकाशवाणी केंद्रावरुन “भारतीय कला संस्कृतीची ओळख” श्रोत्यांना व्हावी.प्राचिन कला स्थापत्य,चित्रकला शिल्पकला याची माहिती व्हावी म्हणून परभणी केद्रावरुन गुढी पाडव्याचे औचित्य साधून दि.२ एप्रिल पासून दररोज सकाळी १०:४० वाजता ‘भारतीय कला संस्कृतीची ओळख’ या विषयावर कला शिक्षक महादेव शरणप्पा खळुरे यांनी दिलेली माहिती ऐकायला मिळणार आहे. गुढी पाडवा हा वर्षाचा पहिला दिवस म्हणून साजरा केला जातो. साडेतीन मुहूर्तांपैकी हा एक मुहूर्त आहे.एका नवीन चांगल्या उपक्रमाला सुरुवात व्हावी म्हणून आँल इंडिया रेडिओच्या परभणी आकाशवाणी केंद्रावरुन ‘कला संस्कृतीची ओळख’ खास गुढीपाडवा या उत्तम मुहुर्तावर श्रोत्यांसाठी यशवंत विद्यालयातील उपक्रमशील कलाशिक्षक खळुरे यांनी दिलेली भारतीय चित्रकला,स्थापत्यकला, भारतातील मंदिर शैली,अंजिठा व वेरुळ लेण्याबद्दलची माहिती रोज सकाळी प्रक्षेपित होणार आहे. खळुरे यांचे यापूर्वी लाँकडाऊन काळातील नाविन्यपूर्ण उपक्रम, प्रदूषण मुक्त दिवाळी लघुनाटिका चे सादरीकरण,एलिमेंटरी व इंटरमिजिएट परीक्षा बद्दलची माहिती, चित्रकला विषयातील करिअर व संधी, मुलांच्या सर्वांगीण विकासात चित्रकलेचे महत्त्व,३१मे तंबाखू विरोधी दिन,ई सिगारेटचे दुष्परिणाम अशा विविध विषयावर मुंबई, नांदेड,परभणी आकाशवाणी केंद्रावरून कार्यक्रम पार पडलेली आहेत. वरील कलाविषय कार्यक्रमाचा सर्व श्रोतेगणांनी श्रवणाचा लाभ घ्यावा असे आवाहान खळुरे यांनी केले. उपक्रमाबद्दल संस्थेचे सचिव दलित मित्र डी.बी.लोहारे गुरुजी,मुख्याध्यापक व्ही.व्ही.गंपले,उप मुअ रमाकांत कोंडलवाडे,पर्यवेक्षक उमाकांत नरडेले,दिलीप गुळवे आदिनी कौतुक केले.