लोकांनी विश्वास दाखवला आहे, कामातून गतीमान प्रशासनाचा संदेश पोहचवूया – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मंत्रिमंडळ बैठकीनंतर साधला सचिव, अधिकाऱ्यांशी संवाद
मुंबई : लोकांनी आपल्यावर विश्वास दाखवला आहे. आपल्या कामातून शासन प्रशासन गतीमान आहे, हा संदेश देऊया, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केले. मंत्रालयात मंत्रिमंडळ बैठकीनंतर सचिव तसेच वरिष्ठ अधिकारी यांच्याशी संवाद साधताना ते बोलत होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बैठकीस उपस्थित होते.
मंत्रिमंडळ बैठकीत दि. २ व ३ जुलै रोजी विधिमंडळाचे विशेष अधिवेशन घेण्याचा निर्णय घेण्यात आला. अधिवेशनात पहिल्याच दिवशी विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे.
मंत्रालयातील समिती सभागृहात झालेल्या बैठकीत बोलताना मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, ‘आपण नवीन सुरुवात करत आहोत. आपल्यासोबत अनुभवी असे उपमुख्यमंत्री आहेत. त्यामुळे कारभार करण्यास अडचण येणार नाही. राज्यातील विकास कामे, विविध प्रकल्प यांना गती द्यावी लागेल. विविध समाज घटकांना न्याय देण्यासाठी लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांनी हातात हात घालून काम करावे लागते. शासन आणि प्रशासन ही एका रथाची दोन चाके आहेत. लोकांनी आपल्यावर विश्वास दाखवला आहे. तो आपल्याला सार्थ ठरवायाचा आहे. आपल्या कामातून गतीमान शासन प्रशासन आहे. असा संदेश आपण कामांच्या माध्यमातून देऊया. मेट्रोचे प्रकल्प, हिंदूहृदसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग तसेच जलसंपदा विभागांचे महत्त्वाचे प्रकल्प कालबद्ध पद्धतीने पूर्ण करावयाचे आहेत. त्यासाठी प्रशासनाचे सहकार्य मिळेलच, हा विश्वास आहे.’
उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, ‘आपल्या सोबत पुन्हा काम करण्याची संधी मिळाली आहे. गतिशीलतेने आणि निर्णय क्षमतेने महाराष्ट्र पुढे नेऊया.’
यावेळी राज्याचे मुख्य सचिव मनुकूमार श्रीवास्तव तसेच सर्व विभागांचे सचिव आदी उपस्थित होते. मंत्रिमंडळ बैठकीत राज्यातील खरीप हंगाम पीक पाणी पीक विमा तसेच राज्यातील कोरोना प्रादुर्भावाबाबतची परिस्थिती यांचे सादरीकरण करण्यात आले.
मंत्रालयात आगमन करताच मुख्यमंत्री श्री. शिंदे तसेच उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी छत्रपती शिवाजी महाराज तसेच भारतरत्न डॅा. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केले.