लातूर आणि परिसरातील जनतेला सर्व प्रकारच्या अद्ययावत सोयी सुविधा पुरविण्यात येतील – माजी मंत्री आ.अमित देशमुख
आ. अमित देशमुख यांच्या हस्ते आर्वी येथील विविध विकासकामांचे भूमिपूजन
लातूर (प्रतिनिधी) : सामाजिक सलोखा, उत्तम कायदा आणि सुव्यवस्था, शैक्षणिक वातावरण, विकासाची दृष्टी या संदर्भातील लातूरचा लौकिक लक्षात घेऊन अनेक ठिकाणाहून लोक या शहरात आणि शहरालगतच्या गावांमधून राहण्यासाठी आले आहेत. त्यांचा तो विश्वास सार्थ ठरवण्याचे काम यापुढेही चालूच राहील, नवनव्या संकल्पना राबवून लातूर आणि परिसरातील जनतेला सर्व प्रकारच्या अद्यावत सोयी सुविधा पुरविण्यात येतील अशी ग्वाही याप्रसंगी बोलताना राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण सांस्कृतिक कार्यमंत्री व लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तथा आमदार अमित विलासराव देशमुख दिली.
अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून आज लातूर शहरालगत असलेल्या आर्वी येथे जलजीवन मिशन कार्यक्रम अंतर्गत २४.६९ कोटींची पाणीपुरवठा योजना आणि जन सुविधेमधून ५६ लाख रुपये खर्चाच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन त्यांच्या हस्ते सोमवार दि. १५ ऑगस्ट रोजी सकाळी केले या प्रसंगी ते बोलत होते.
यावेळी लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष किरण जाधव, लातूर जिल्हा नियोजन समितीचे सदस्य समद पटेल, आर्वीचे सरपंच बापु चव्हाण, उपसरपंच सचिन सुरवसे, माजी सरपंच धनंजय देशमुख, माजी उपसरपंच विलास भोसले, मिन्नूशेठ अग्रवाल, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता लातूर एसव्ही कायंदे, प्रवीण सूर्यवंशी, सागर कुपकर, मोरेश्वर माने ,गटविकास अधिकारी तुकाराम भालके, आर्वी ग्रामविकास अधिकारी एसआर शेख, कंत्राटदार सुरेश लहाने, ज्ञानेश्वर चौधरी, अश्विन चव्हाण, पंडित ढमाले, धनराज गडदे, महेश काळे, अरदापूरे सुवर्णा, अक्षय शिराळकर आदीसह काँग्रेस पक्षाचे विविध पदाधिकारी कार्यकर्ते आर्वी गावचे ग्रामपंचायत सदस्य सर्व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रारंभी लोकनेते विलासराव देशमुख व आर्वी गावचे माजी सरपंच कैलासवासी शेखर शिराळकर यांच्या प्रतिमेला आमदार अमित देशमुख व मान्यवरांनी पुष्प अर्पण करून विनम्र अभिवादन केले.
यावेळी पूढे बोलतांना माजी मंत्री आमदार अमित देशमुख म्हणाले की, भारताच्या स्वातंत्र्याची ७५ वर्षे पूर्ण झाले आहेत. १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करीत आहोत, असे सांगून सर्वांना दिल्या. जगामध्ये भारतीय म्हणून आपल्या सगळ्यांना आपल्या भारताचा अभिमान आहे. भारताला सोने की चडीया असे म्हणत असा भारत आज जगामध्ये सुपर पॉवर म्हणून नावारूपाला आला आहे. भारतचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यापासून भारताच्या जडणघडणीची सुरुवात झाली. या भारताच्या जडणघडणीमध्ये तुम्हा सर्वांचा सिंहाचा वाटा आहे. यानिमित्ताने आर्वी गावला नळाद्वारे पिण्याचे पाणी देण्याची योजनेच आज भूमिपूजन होत आहे. लोकनेते विलासराव देशमुख, माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर, माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांचे नाव ऐकून येथे लोक राहायला येतात कायदा व सुव्यवस्था येथे उत्तम आहे, आर्वी नागरिकांसाठी दर्जेदार सोयी सुविधा उपलब्ध करून देऊ, प्रत्येकाच्या घरापर्यंत दाबाने पाणी मिळेल अशी जलवाहिनी टाकावी अशी सूचना त्यांनी संबंधितांना केली.
पुढे बोलताना ते म्हणाले की, मागच्या काळात अनेक योजना गावासाठी मंजूर केले आहेत. विविध योजनांसाठी ५६ लाख रुपये मंजूर केले आहेत, साई रोड ते आरजखेडा रस्त्यासाठी अडीच कोटी रुपये निधी मंजूर केला आहे. लोकनेते विलासराव देशमुख यांचे नेतृत्व विचार शिकवणीच्या मार्गानेच आम्ही पावल टाकत आहोत असे सांगून त्यांनी आर्वी गावच्या सर्वांगीण विकासासाठी मी कटिबद्ध आहे अशी ग्वाही दिली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक धनंजय देशमुख व महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे लातूर कार्यकारी अभियंता एस.व्ही.कायंदे यांनी करून योजनेची सविस्तर माहिती दिली, तर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार अंकुश चव्हाण यांनी मानले.