सातव्या दिवशी प्रथेप्रमाणे श्री गणरायाचे विसर्जन

सातव्या दिवशी प्रथेप्रमाणे श्री गणरायाचे विसर्जन

उदगीर (प्रतिनिधी) : उदगीर शहरात प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षीही “गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या”अशा जयघोष मध्ये, तसेच ढोल ताशाच्या गजरात, गुलाल, फुलांची उधळण करत, तसेच फटाक्यांची आतषबाजी करून श्री गणरायाला भाविक भक्तांनी भव्य मिरवणूक काढून निरोप दिला.

गेल्या दोन वर्षापासून कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जमावबंदी आणि सण, उत्सव यावर निर्बंध लादले होते. मात्र शिंदे आणि देवेंद्र फडणवीस सरकार आल्यानंतर त्यांनी सण, उत्सव मोठ्या उत्साहात साजरे करा. असे सांगत सर्व निर्बंध रद्द केले आहेत .

त्यामुळे मोठ्या उत्साहात गणेश भक्त मंडळांनी विसर्जन मिरवणुकीसाठी जय्यत तयारी केली होती. उदगीरच्या परंपरेनुसार सातव्या दिवशी गणरायाला निरोप देण्यात येतो. मंगळवारी सकाळपासून श्री गणरायाला निरोप देण्यासाठी सर्वत्र उत्सवाचे वातावरण होते. उदगीर शहरातील मानाचा समजला जाणारा आजोबा गणपती पारकट्टे गल्लीमध्ये बसवला जातो. या गणरायाची आरती करून त्यानंतरच शहरातील गणरायाचे विसर्जन केले जाते.

सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास मान्यवरांच्या हस्ते गणरायाची आरती करून विसर्जनाची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर शहरातील इतरही गणेश मंडळांनी विसर्जनाची जय्यत तयारी सुरू केली. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार उदगीर शहरात 55 गणेश मंडळाची स्थापना करण्यात आली होती. त्यापैकी 35 गणेश मंडळांनी श्री ची स्थापना करण्यापूर्वीच रीतसर परवाना घेतला होता. तर इतरांनी परवान्यासाठी अर्ज दाखल केले होते. त्यांनाही नंतर परवाना देण्यात आला.
उदगीर शहर पोलीस स्टेशनचे ज्येष्ठ पोलीस निरीक्षक गोरख दिवे, ग्रामीण पोलीस स्टेशनचे जेष्ठ पोलीस निरीक्षक दीपक कुमार वाघमारे यांच्या दोन्हीही पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या कर्मचाऱ्यांनी आणि विभागीय पोलीस उपाधीक्षक डॅनियल जॉन बेन यांच्या विशेष पथकाने चोख बंदोबस्त ठेवला होता.

About The Author

error: Content is protected !!