लवकरच लातूर रोड ते बोधन मार्गे जळकोट, मुखेड, बिलोली रेल्वे सुरू होणार – आ.संजय बनसोडे
उदगीर (एल.पी. उगिले) : लातूर रोड मार्गे जळकोट, मुखेड, बिलोली बोधन रेल्वे मार्ग निर्माण व्हावा. ही मागणी गेल्या अनेक वर्षापासूनची आहे.या मागणीचा पाठपुरावा आ.संजय बनसोडे यांनी सुरू केला आहे.
यापूर्वीही या मार्गाची पाहणी झालेली आहे. सदरील मार्ग हा 130 किलोमीटर अंतराचा असून या रेल्वे मार्गावर कुठेही नदी, पर्वत किंवा अडथळ्याचे ठिकाण नसून सरळ मार्ग आहे. या भौगोलिक परिस्थितीचा फायदा घेऊन जनतेच्या हितासाठी हा दोन जिल्ह्यांना,पाच मंडळांना जोडणारा रेल्वे मार्ग सुरू करावा, या उद्देशाने उदगीरचे आमदार तथा माजी गृहराज्यमंत्री संजय बनसोडे यांनी रेल्वेमंत्री ना. अश्विनीजी वैष्णव यांची भेट घेऊन या मार्गाला तात्काळ मंजुरी द्यावी. आणि तशी तरतूद येणाऱ्या आर्थिक बजेटमध्ये नोंद करावी. अशी विनंती केली आहे.
लातूर रोड ते बोधन या रेल्वे लाईन मुळे व्यापारी, शेतकरी, विद्यार्थी, गोरगरीब जनता या सर्वांचे भले होऊन ग्रामीण भागातील जनतेला रोजगार उपलब्ध होणार आहे. तसेच रेल्वेला देखील या मार्गामुळे चांगला आर्थिक फायदा मिळणार आहे.
या पार्श्वभूमीचा विचार करून हा रेल्वे मार्ग जितक्या लवकर शक्य होईल, तितक्या लवकर मंजूर करावा. या रेल्वे मार्गासाठी दिल्ली येथून काही खासदारांनी एका समितीमार्फत प्रत्यक्ष जळकोट येथे येऊन पाहणी केली होती. तसेच या रेल्वे लाईनच्या संदर्भातील सर्व कागदपत्रे आणि नियोजनाचे पूर्ण दस्ताऐवज माजी रेल्वेमंत्री पियुष गोयल यांना दिले होते, ते रेल्वे भवन येथे आहेतच. तरी कृपा करून सदरील रेल्वे लाईन मंजूर करून येणाऱ्या बजेटमध्ये त्याची नोंद घ्यावी, आणि तशी सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिली जावी. अशी ही विनंती उदगीर विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय बनसोडे यांनी रेल्वे मंत्राकडे केली आहे.
यासोबतच बिदर ते पुणे ही रेल्वे नियमित केली जावी. दररोज ही रेल्वे झाल्यास या भागातील जनतेला याचा फायदा होणार आहे. त्यासोबतच या रेल्वेसाठी स्वतंत्रपणे एक सामान्य डब्बा, एक स्लीपर कोच आणि एक रिझर्व कोच अशा सर्व प्रवर्गातील लोकांसाठी आगाऊचे डबे जोडावेत. अशी ही विनंती आमदार संजय बनसोडे यांनी रेल्वेमंत्री अश्विनीजी वैष्णव यांच्याकडे केली आहे. याप्रसंगी अमोल बिरादार पाटील कोळखेडकर, बसवराज पाटील नागराळकर हे देखील उपस्थित होते.
