अहमदपूरच्या महात्मा फुले महाविद्यालयास बी.जे. पदवी अभ्यासक्रमाला मान्यता
अहमदपूर (गोविंद काळे) : येथील महात्मा फुले महाविद्यालयात चालू शैक्षणिक वर्षापासून नव्याने बी.जे. अर्थात (बॅचलर ऑफ जर्नलिझम ) पत्रकारिता पदवीपाठ्यक्रम सुरू करण्याची मान्यता नाशिक येथील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाने दिली आहे.त्यामुळे पत्रकारितेत करियर करू इच्छिणाऱ्यांना मध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे नांदेड विभागीय परिक्षेत्रातील एक आदर्श अभ्यास केंद्र म्हणून महात्मा फुले महाविद्यालयातील अभ्यास केंद्राची ओळख आहे. या अभ्यास केंद्रात नव्याने बी. जे. ह्या पदवीत अभ्यास केंद्रास मान्यता मिळाली असून, याबाबत यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ विभागीय कार्यालयाचे सहायक कुलसचिव डॉ.चंद्रका़त पवार, विभागीय संचालक डॉ. बी. के. मोहन यांचे सहकार्य लाभले.
महात्मा फुले महाविद्यालयात बी.जे. पदवीसाठी प्रवेश सुरू झाले आहेत. अशी माहिती प्राचार्य तथा केंद्रप्रमुख डॉ.वसंत बिरादार पाटील यांनी दिली. तसेच, एम. ए. हिंदी, एम.ए. मराठी, बी.ए. या पाठ्यक्रमास अधिकाधिक विद्यार्थ्यांनी प्रवेश घ्यावा असे आवाहन प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांनी व केंद्र संयोजक प्रो. डॉ. अनिल मुंढे, केंद्र सहाय्यक डॉ. संतोष पाटील यांनी केले आहे.