जगा आणि जगूद्याचे पर्यावरण असले पाहिजे – प्रा.डॉ.परमेश्वर पौळ
मुखेड (गोविंद काळे) : पर्यावरण हे दोन प्रकारचे असते.एक मानवनिर्मित तर दुसरे निसर्गनिर्मित. सांस्कृतिक पर्यावरण ही महत्त्वाची असते.निसर्ग जिथे आपणास थांबा म्हणून सांगतो तिथे आपण थांबले पाहिजे. आपल्याकडे पूर्वीपासूनच आदिवासी समाज निसर्गाची पूजा करतो. शेतकऱ्यांना जेवढे बॉटनीचे ज्ञान आहे तेवढे आपणास नसते. अन्न, वस्त्र,निवारा याबरोबरच विद्याध्ययन आपली गरज आहे.शिस्त अंगी बाळगा. मानवनिर्मित मोबाईल हे पर्यावरण नष्ट करत आहे. नैसर्गिक साधनसंपत्ती भारतासारख्या देशात विपुल प्रमाणात आहे. आपण गाय,बैल,म्हैस,गोव-या या यासारख्या महत्त्वाच्या नैसर्गिक साधन संपत्तीचा -हास करतो आहोत. हे धोकादायक आहे. महाविद्यालयात विद्यार्थ्यांनी जगण्याचे शिक्षण घेण्यासाठी आले पाहिजे. आज सामाजिक पर्यावरण बिघडत चालले आहे. निसर्ग जीवन समजून घेऊन त्याचा मेळ घातला पाहिजे.जगा आणि जगूद्याचे पर्यावरण असले पाहिजे असे प्रतिपादन कै. शंकराव चव्हाण महाविद्यालय अर्धापूर येथील प्रा.डॉ. परमेश्वर पौळ यांनी ग्रामीण (कला, वाणिज्य व विज्ञान ) महाविद्यालय वसंतनगर ता.मुखेड येथील भूगोल विभाग व वनस्पतीशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने अभ्यास मंडळाच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख वक्ते म्हणुन बोलताना केले. यावेळी दुसरे पाहुणे प्राचार्य डॉ. हरिदास फेरे म्हणाले की ६५० कोटी वर्षांपूर्वी पृथ्वीची निर्मिती झाली. पुढे भूगोल, वनस्पतीशास्त्र निर्माण झाले. आपला विकास हा भाषा, ज्ञानामुळे व पुढे विज्ञानामुळे झाला. शिक्षणाचा मुख्य उद्देशच जाणीव निर्माण करणे आहे.आज शिकुनही नोकरी मिळत नाही म्हणणे हे विधान अर्ध सत्य आहे शिक्षणाशिवाय नोकरी मिळत नाही हे पूर्ण सत्य आहे.परिस्थितीची आपणास गोळा बेरीज करता आली पाहिजे. आपण आपली गती वाढवणे म्हणजेच विकास आहे. वय वाढने ज्ञान वाढने योग्य नाही.
अध्यक्षीय समारोप करताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. हरिदास राठोड म्हणाले की आजचे दोन्ही पाहूणे हे त्या त्या क्षेत्रातील उंची गाठलेले आहेत. आपण आज स्थापन केलेल्या अभ्यास मंडळातील विद्यार्थ्यांना वृक्षारोपण व एक वृक्ष संवर्धन एवढा संकल्प करून कार्य केले पाहिजे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय भूगोल विभाग प्रमुख प्रा.डॉ. वसंत नाईक यांनी करून दिला. सूत्रसंचलन वनस्पती शास्त्र विभाग प्रमुख प्रा.सुभाष कनकुटे यांनी केले तर आभार प्रा. श्रीकांत जेवळे यांनी मानले.
यावेळी दोन्ही विषयाच्या अभ्यासमंडळाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी दोन्ही अभ्यास मंडळातील विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते. सदरील कार्यक्रमाचा लाभ प्राध्यापक, विद्यार्थी विद्यार्थिनींनी घेतला.