आत्मारामाच्या साक्षातकारातून अहंकाररुपी रावणाचे दहन होते – ह.भ.प. डॉ. शरदकुमार तेलगाणे
उदगीर (एल.पी.उगीले) : प्रत्येक जीवात्म्यामध्ये आत्मारामरुपी परमेश्वराचा अंश असतो. त्याचा साक्षात्कारच माणसाला अध्यात्मात गोडी लावतो. त्यासाठी आत्मारामरुपी जी शक्ती आहे, त्या शक्तीचे आत्मचिंतन करावे. ती आत्मसात करावी. म्हणजे जीवनाला अर्थ प्राप्त होतो. मानवी जीवनामध्ये अहंकार हा रावणापेक्षा भयानक आहे. त्याचे दहन होणे गरजेचे आहे. तसेच आळस रूपामध्ये कुंभकर्ण रुपी निद्रा यापासूनही मानवाने दूर राहिले पाहिजेत, एकंदरीत काय तर मानवाने अध्यात्मात प्रगती करायची असेल तर षडरिपू पासून दूर राहिले पाहिजे, ज्यामध्ये प्राधान्याने राग, लोभ, मोह, काम, क्रोध, माया यांचा समावेश असतो.
असे विचार उदगीर येथील प्रथित यश डॉक्टर तथा प्रबोधनकार कीर्तनकार ह. भ. प. डॉक्टर शरदकुमार तेलगाणे यांनी व्यक्त केले. ते उदगीर शहरातील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या दुर्गा आर्केड या ठिकाणी आयोजित कीर्तन सेवेत प्रबोधन करताना सांगत होते.
संत साहित्याच्या संदर्भात माहिती सांगताना मानवी जीवनामध्ये प्रलोभन कशा पद्धतीने मनामध्ये नको ते विचार निर्माण करते, आणि सदसदविवेक बुद्धीवर ताबा मिळवून चुकीचे करायला भाग पाडते. यासंदर्भातही त्यांनी सांगितले. हे सर्व टाळण्यासाठी संतांची संगती असावी. वारकरी संप्रदायाचे अनुकरण करावे. ज्या संस्कृतीमध्ये आदर्श तत्व सांगितलेले आहेत, त्या भारतीय संस्कृतीचे तंतोतंत पालन करावे.
पाश्चात्त्य संस्कृतीपेक्षा भारतीय संस्कृती जगात श्रेष्ठ आहे. त्यासाठी भारतीय संस्कृतीचे रक्षण करावे. गळ्यात तुळशीची माळ आणि कपाळी गोपीचंदनाचा टिळा हे लक्षण संतांचे आहे. याची जाण ठेवून संस्काररूपी सदगुणांचा सर्वांनी अंगीकार करावा, असेही सांगितले. या कीर्तन सोहळ्यासाठी उदगीर शहरातील भाविक, भक्तांची मोठी गर्दी होती.
