युवक महोत्सवात महात्मा फुले महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी ‘हर घर तिरंगा’ या एकांकिकेतून दिला देशभक्तीचा संदेश

युवक महोत्सवात महात्मा फुले महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी 'हर घर तिरंगा' या एकांकिकेतून दिला देशभक्तीचा संदेश

अहमदपूर (गोविंद काळे) : स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेडच्या विद्यापीठस्तरीय युवक महोत्सवात अहमदपूर येथील महात्मा फुले महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या एकांकिकेला रसिक श्रोत्यांनी उदंड प्रतिसाद दिला. या एकांकिकेतून विद्यार्थी कलावंतांनी देशभक्तीचा संदेश दिला.

याबाबत अधिक माहिती अशी की नांदेड येथील ग्रामीण पाॅलिटेक्निक तंत्रज्ञान महाविद्यालयाच्या प्रांगणात स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या वतीने विद्यापीठस्तरीय ‘ राष्ट्रचेतना युवक महोत्सव – २०२२’ सुरू असून या महोत्सवाचा तिसरा दिवस अहमदपूर येथील महात्मा फुले महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी ‘ एकांकिका’ या कलाप्रकारात महात्मा फुले महाविद्यालयातील हिंदीचे प्राध्यापक तथा प्रसिद्ध, नाटककार, अनुवादक तथा लेखक डॉ. पांडुरंग चिलगर लिखित ” हर घर तिरंगा” ही एकांकिका सादर करुन उपस्थितांची वाहवा मिळविली. महात्मा फुले महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थी कलावंतांनी या एकांकिकेचा नाट्याविष्कार सादर केला.

जयवंत दळवी रंगमंचावर सादर झालेल्या या एकांकिकेतून विद्यार्थ्यांनी ‘हरघर तिरंगा’ या मोहिमेबद्दल जनजागरण केले. तसेच देशातील समकालीन प्रश्नांची मांडणीही या एकांकिकेतून करण्यात आली. यावेळी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले, विद्यापीठ परीक्षा नियंत्रक डॉ. दिगंबर नेटके, मानव्य विद्या अधिष्ठाता डॉ. अजय टेंगसे, विद्यार्थी विकास मंडळाचे संचालक डॉ. सूर्यप्रकाश जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती. या एकांकिकेला मान्यवरांसह रसिक प्रेक्षकांनी टाळ्यांच्या गजरात भरभरून प्रतिसाद दिला. या कलाप्रकारात रोहन कांबळे, अमोल बनसोडे, राम पाटील, विश्वनंदा नंदवंशी, वैष्णवी स्वामी, भागवत भोसले, ज्ञानेश्वर श्रीरामे , प्रशांत काळे या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. कलावंत विद्यार्थ्यांना संघप्रमुख डॉ. अनिल मुंढे, डॉ. मारोती कसाब, प्रा. सीमा गीते आणि डॉ. अभिजीत मोरे यांचे मार्गदर्शन लाभले.

About The Author