दयानंद कला महाविद्यालयात शिष्यवृत्ती संदर्भात मार्गदर्शन शिबीर संपन्न
लातूर (प्रतिनिधी) : दयानंद कला महाविद्यालयात प्राचार्य डॉ. शिवाजी गायकवाड यांनी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती आवेदन पत्रात येणाऱ्या अडचणी संदर्भात मार्गदर्शन शिबीराचे आयोजन केले. हे मार्गदर्शन सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण विभाग व दयानंद कला महाविद्यालय, लातूर यांच्या वतीने दयानंद कला महाविद्यालयाच्या सभागृहात इयत्ता अकरावी ते सर्व पदवी, पदव्यूत्तर अनुदानित व विनाअनुदानित वर्गातील सर्व विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती फॉर्म भरत असताना लागणारी सर्व कागदपत्रे, ऑनलाईन आवेदन पत्रात येणाऱ्या तांत्रिक अडचणी यासंदर्भात सखोल असे मार्गदर्शन केले.
विद्यार्थ्यांनी सर्वप्रथम आपला मोबाईल क्रमांक आधार क्रमांकाशी जोडून घ्यावा, आधार कार्ड राष्ट्रीयकृत बँकेतील खात्याशी लिंक करून घ्यावे. यानंतरच शिष्यवृत्तीचा फॉर्म दिलेल्या तारखेपर्यंतच भरला पाहिजे. आणि आधार कार्ड लिंक केलेला मोबाईल क्रमांक शैक्षणिक जीवन संपेपर्यंत आपण तो बदलू नये असे प्रतिपादन श्री अमोल मुळे यांनी केले. तसेच शिंदे श्रीराम यांनी ऑनलाईन फॉर्म भरताना आपण युजर आयडी आणि पासवर्ड सोप्या शब्दात तयार करावा आणि तो शेवटपर्यंत जतन करून ठेवावा जेणेकरून तुम्हाला तुमच्या फॉर्मची स्थिती जाणून घेता येऊ शकते बरेच विद्यार्थी युजर आयडी व पासवर्ड विसरतात, मोबाईल नंबर बंद करतात त्यामुळे शिष्यवृत्तीच्या माध्यमातून मिळणाऱ्या फिस मध्ये सवलत मिळण्यास फार मोठी अडचण येऊ शकते असे मत व्यक्त केले. श्री. नागेश जाधव व श्री. मनोज मोरे यांनी शिष्यवृत्ती आवेदनपत्र ऑनलाईन भरण्याविषयीची माहिती दिली.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य अनिलकुमार माळी, पर्यवेक्षक डॉ. दिलीप नागरगोजे, अधीक्षक श्री रूपचंद कुरे, डॉ. गोपाल बाहेती, प्रा विलास कोमटवाड, प्रा सुरेश क्षिरसागर, प्रा. सुधीर गाढवे, शिष्यवृत्ती विभागाच्या श्रीमती सुरवसे अश्विनी तसेच महाविद्यालयातील विद्यार्थी व विद्यार्थीनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
